उस्मानाबाद : बांधावरून होणार वाद नवे नाहीत. मात्र,कोणी जर सांगितले की, एका गावात चक्क ३२ एकर जमीन माकडांच्या नावे आहे. तर विश्वास ठेवा तुम्ही बरोबर वाचले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उपळा या गावात माकडांच्या नावे ३२ एकर जमीन आणि दोन मजली घर आहे. या दुर्मिळ घटनेची आता चांगलीच चर्चा आहे.
गावाचे सरपंच दत्तात्रय ( बाप्पा ) पडवळ सांगतात की, आम्हाला समजते तसे गावात मोठ्या प्रमाणावर माकड आहेत. त्यांना ग्रामस्थ घरातील सदस्यांप्रमाणे वागवतात. प्रत्येक सण समारंभात त्यांना मोठा मान दिला जातो. लग्नात देखील पहिले जेवण त्यांना वाढतात त्यानंतर पंगती बसतात. याशिवाय कोणत्याही दारात आलेले माकड उपाशी राहत नाही. प्रत्येक ग्रामस्थ मोठ्या आस्थेने या माकडांची काळजी घेतो. तसेच एखाद्या माकडाचा मृत्यू झाला तर त्याला नवीन कपडे करून , अंत्ययात्रा काढत अंतिम संस्कार ग्रामस्थ करतात.
३२ एकर सातबाऱ्यावर माकडांची मालकीमाकडांच्या नावे थोडीथोडकी नव्हे तर चक्क ३२ एकर जमीन असणे हे अत्यंत दुर्मिळ आहे. अनेक पिढ्यांपासून हे चालत आले आहे. कधी आणि कोणी हि जमीन त्यांच्या नावे केली याची माहिती नसल्याचे सरपंच दत्तात्रय पडवळ सांगतात. याशिवाय गावात माकडांसाठी दोन मजली घर देखील राखीव होते. आता आते त्याची पडझड झाली आहे. माकडांची संख्या अधिक असल्याने गावाची ओळखच ' उपळा माकडांची' अशी झाली आहे.
आता अचानक संख्या झाली कमी पूर्वी गावात माकडांचे प्रमाण जास्त होते. मात्र, माकडांचा अधिवास असलेली शेकडो वर्षांपूर्वीची झाडे आता राहिली नाहीत. तसेच गावातील झाडेही कमी झाली आहेत. त्यामुळे काही माकडे दुसऱ्या गावात गेली, गावात अद्यापही १०० पेक्षा अधिक माकडे आहेत. ग्रामस्थांनी आता वृक्षारोपणाचा चंग बांधला आहे. गावाची ओळख असलेली माकडांची संख्या पुन्हा वाढेल असा विश्वास येथील ग्रामस्थांना आहे.