तुळजापूर : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून, येथे श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी प्रशासनाकडून अद्याप कसल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे भाविकांना डोक्यावर उन्ह अन् पायाचे चटके सहन करीत मंदिर गाठावे लागत आहे.
श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्याच्या कानाकोपऱ्यातुन भाविक येतात. यामुळे मंदिर परिसरासह मंदिर महाद्वार, खडकाळ गल्ली, शुक्रवार पेठ, महाद्वार रोड, आर्य चौक, भवानी रोड, कमान वेस या भागात भावीकांची सतत रेलचेल असते. प्रत्येक वर्षी प्रशासनाकडून काही ठिकाणी नेट व मॅटची सोय करण्यात येते. परंतु, यंदा मात्र उन्हाची तीव्रता वाढत असता पालिका व मंदिर प्रशासनाकडून नेट, रस्त्यावर मॅट अद्याप टाकण्यात आल्या नाहीत. भाविकांना रखरखत्या उन्हात पायाला चटके सहन करीत मंदिरात जाऊन श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घ्यावे लागत आहे. तसेच मंदिर महाद्वार ते श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात देखील नेट व मॅटची सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे.
चौकट.........
विकतच्या पाण्यावर भागवावी लागते तहान
सध्या उन्हाची तीव्रता वढाली असून, शहरात येणाऱ्या भाविकांना पाणपोईअभावी विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. महाद्वारासमोर नगर परिषदेने आरओ प्लांटची सोय केली आहे. परंतु, भवानी रोड, आर्य चौक, दोन्ही बसस्थानके, आराधवाडी, कमान वेस, खडकाळ गल्ली, शुक्रवार पेठ, घाटशीळ रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कार पार्किंग या भागात पाण्याची कसलीही सोय नाही. त्यामुळे येथे पाणपोईची व्यवस्था करण्याची गरज व्यक्त होत आहे.
उन्हाची तीव्रता वाढली असून, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून अद्याप कसलीही उपाययोजना केली गेली नाही. मंदिर परिसरात व महाद्वार परिसरात मॅट व नेटची सुविधा नसल्याने भाविकांना उन्हाचे चटके बसत आहेत. याबाबत मंदिर प्रशासनाकडे सूचना देण्यासाठी गेलो होतो. परंतु, तिथे कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे मंदिर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात.
- किशोर गंगणे, अध्यक्ष, पुजारी मंडळ