लोहारा : शहरातील प्रभाग क्रमाक १५ मध्ये रस्ता मजबुतीकरणाचे काम वगळता सिमेंट रस्ता, नाल्याच्या कामाकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. यामुळे पावसाळ्यात या भागातील बहुतांश रस्ते जलमय झाल्याचे दिसते.
शहरातील प्रभाग क्रमाक १५ मध्ये तलाठी कार्यालय, गणेश प्लॉटिंगचा भाग येतो. उत्तरेस बाबू मिणीयार घर ते महंमद हुसेन बागवान घर, पूर्वेस महंमद हुसेन बागवान घर, सलीम कुरेशी घर ते साहेबलाल घर, दक्षिणेस साहेबलाल घर ते कलिम बांदार घर, पश्चिमेस कलिम बांदार घर ते बाबू मिणीयार घर अशी या प्रभागाची रचना आहे. या प्रभागाला नगरसेविका नाजमीन शेख यांच्या रुपाने प्रथम उपनगराध्यक्षपदाची संधी मिळाली. यामुळे प्रभागातील मूलभूत सुविधांचा प्रश्न मिटेल, अशी आशा नागरिकांत होती. येथील सलीम सय्यद घर, शेवाळे घर ते शहाबुद्दीन घर, दाऊत शेख घर, खलील कुरेशी घर ते अलीम सुंबेकर घरापर्यंत रस्त्याचे मजबुतीकरण करून कच्चा रस्ता करण्यात आला. शिवाय पाण्याची पाईपलाईन करण्यात आली आहे. तसेच प्रभागात लाईटची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच बागवान घर ते शमू फकीर घर सिमेंट रस्ता करण्यासाठी मंजुरी घेण्यात आली आहे. परंतु, एवढ्यावरच विकासकामे थांबली.
सद्यस्थितीत बहुतांश कच्चे रस्ते उखडले असून, पावसाळ्यात तर या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट होते. यामुळे नागरिकांना घराकडे ये-जा करते वेळी त्रास सहन करावा लागत आहे. तसेच नाल्याचीही कामे न झाल्याने सांडपाणी रस्त्याच्या कडेनेच वाहाते. त्यात पावसाळ्यात पावसाचे पाणी व सांडपाणी एकत्रितच रस्त्यावरून वाहात असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. विशेषत: तलाठी कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून राहात असल्याने यातून वाट शोधताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागते.
प्रभाग क्रमांक १५ला सुरुवातीची अडीच वर्षे उपनगराध्यक्षपद मिळाले. यामुळे विकासकामे होतील, अशी आशा नागरिकांत होती. परंतु, सिमेंट रस्ते, नाल्यासह इतर कामे अद्याप मार्गी लागली नाहीत. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
- सुतलाना रफीक शेख, रहिवासी
प्रभाग क्रमाक १५ला सुरुवातीची अडीच वर्षे उपनगरध्यक्षपद मिळाले तरी या काळात ना सिमेंट रस्ते झाले, ना नाल्या झाल्या. यामुळे या प्रभागाच्या समस्या आजही कायम आहेत.
- वैजिनाथ माणिकशेट्टी, रहिवासी
माझा प्रभाग हा अल्पसंख्याक असल्याने नगराध्यक्षांनी जाणूनबुजून या प्रभागातील कामे दुसऱ्या प्रभागात वळविली. तसेच होणारी कामेही सत्ताधारी गटाकडून अडविण्यात आली आहेत.
- नाजमीन आयुब शेख,
नगरसेविका
फोटो - लोहारा शहरातील प्रभाग क्रमाक १५ मधील तलाठी कार्यालयाच्या बाजूच्या रस्त्यावर पावसाळ्यात असे पाणी थांबते. (संग्रहीत फोटो)