कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता २३ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या काळात शासनाने राज्य परिवहन विभागाची बस सेवाही बंदच करण्यात आली होती. रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने पुन्हा एसटी बस सेवा सुरू करण्यात आली. एसटी सुरू झाल्यानंतर पहिला एक महिना कोरोनाच्या धास्तीने प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. दिवसाकाठी १५ ते २० हजार प्रवासी प्रवास करीत होते. ऑक्टोबर महिन्यात रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली. त्यामुळे बसलाही प्रवाशांचा प्रतिसाद मिळू लागला. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता महामंडळाकडून बसफेऱ्या वाढविल्या. लांब व मध्यम पल्ल्याच्या गाड्याही नियमित धावू लागल्या. दिवसाकाठी ९० हजार प्रवासी प्रवास बसमधून प्रवासी बसमधून प्रवास करू लागले; मात्र मागील दहा दिवसांपासून जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. शिवाय, शेजारील जिल्ह्यातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे एसटीची प्रवासी संख्याही घटू लागली आहे. ९० हजाराहून प्रवाशांचा आकडा ७० हजारांवर आला आहे. लांब पल्ल्याच्या बसेसलाही प्रवासी कमी असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.
पॉईंटर...
जिल्ह्यातील एसटीने रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या
१ लाख
लॉकडाऊन खुला केल्यानंतरची संख्या
२० हजार
एसटीने सध्या प्रवास करणाऱ्यांची संख्या
७० हजार
लांब पल्ल्याच्या गाड्यांना अल्प प्रतिसाद
इतर जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या बस गाड्यांना मागील पाच-सहा दिवसांपासून प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे.
सध्या सर्वच मार्गावरील बसेस धावत आहेत.
तुळजापूर-शेगाव, उस्मानाबाद-सुरत, उस्मानाबाद-पणजी, उस्मानाबाद हैदराबाद या मार्गावरील बसला प्रवासी कमी असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
सर्वच मार्गावरील एसटी सुरूच
जिल्ह्यातील सहा आगारात सुमारे ४५० बसेस आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर ४० ते ५० बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. सध्या ३५० बसेस विविध मार्गांवर धावत आहेत.
शाळा, महाविद्यालये सुरू असल्याने विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वच मार्गांवरील बसेस सुरूच आहेत.
फिजिकल डिस्टन्सचा फज्जा
कोरोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीस मास्क व फिजिकल डिस्टन्स ठेवणे बंधनकारक केले आहे; मात्र बसस्थानकावर फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडत असल्याचे चित्र पहावयास मिळते, तसेच बहुतांश प्रवासी विनामास्क प्रवास करताना आढळून येतात.