उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठात रूपांतर व्हावे, यासाठी मागील काही वर्षांपासून सातत्याने जनरेटा सुरू आहे. गतवर्षी या मागणीला चांगलेच बळही मिळाले. मात्र, औरंगाबादेतून विभाजनास विरोध झाल्याने हा प्रस्ताव बासनात गेला. दरम्यान, आता पुन्हा एकदा हा जनरेटा वाढू लागला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या शुक्रवारच्या उस्मानाबाद दौऱ्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळाने त्यांच्याकडे जोरदार आग्रह धरला. त्यावर महिनाभरात याबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावू, असे त्यांनी आश्वासित केले आहे.
१९९४ साली औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाच्या विभाजनावेळी उस्मानाबाद जिल्हा हा नांदेड विद्यापीठात समाविष्ट केला जात होता. मात्र, नांदेडपेक्षा औरंगाबाद सोईचे असल्याने उस्मानाबाद जिल्हा औरंगाबाद विद्यापीठातच कायम राहिला. त्याचवेळी उस्मानाबाद येथे उपकेंद्राची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केली होती. प्रत्यक्षात हे उपकेंद्र १६ ऑगस्ट २००४ रोजी कार्यान्वित झाले. उपकेंद्रात सुरुवातीला ६ पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आले होते. नंतर नव्याने ४ पदव्युत्तर अभ्यासक्रम याठिकाणी सुरू करण्यात आले आहेत. सुमारे ४० कोटी रुपये खर्च करून विद्यापीठ स्वनिधीतून उत्तम प्रकारच्या भौतिक सुविधा उभारल्या जात आहेत. विद्यापीठासाठी आवश्यक असणाऱ्या बहुतांश भौतिक बाबी याठिकाणी उपलब्ध असल्याने स्वतंत्र विद्यापीठ उभारणीस लागणारा खर्च ५० टक्क्यांपेक्षाही कमी होईल, असे शिष्टमंडळाने मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संजय दुधगावकर, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, काँग्रेसचे जिल्हा संघटक राजेंद्र शेरखाने, नगरसेवक सूरज साळुंके, ॲड.खंडेराव चौरे, दिलीप जावळे, नानासाहेब जमदाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यामुळे होऊ शकतो मार्ग सुकर...
उपकेंद्राकडे स्वत:चा ६० एकराचा विस्तीर्ण भूखंड आहे. तसेच ४० कोटी रुपयांच्या भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये ५ कोटी रुपये खर्चाची प्रशासकीय इमारत तयार आहे. ७ कोटींचे विज्ञान भवन असून, आणखी साडेपाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत. साडेआठ कोटी रुपयांचे मुलींचे वसतिगृह पूर्ण झाले आहे. ६ कोटी रुपये खर्चाचे मुलांचे वसतिगृह निविदा प्रक्रियेत आहे. तसेच २ कोटी रुपये खर्चाची कोविड लॅब विद्यापीठ व लोकसहभागातून उभी करण्यात आली आहे. यातून आतापर्यंत लाखावर चाचण्या झाल्या आहेत. आता साडेसात कोटी रुपये खर्चाचे नवीन ग्रंथालय बांधकाम प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.