कळंब: अंतरवाली येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व तेथे दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी दहिफळ येथील किरण मोहन भातलवंडे या तरुणाने गावातील खंडोबा मंदिरासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीचार्जचे कळंब येथे तीव्र पडसाद उमटले होते. शुक्रवारी रात्री ठिय्या आंदोलन तर शनिवारी कळंब बंद करण्यात आले होते.आता यासंबंधी ग्रामीण भागातही प्रतिक्रिया उमटत आहेत. तालुक्यातील दहिफळ येथील किरण मोहन भातलवंडे या ३२ वर्षीय तरुणाने गावातीलच खंडोबा मंदिरासमोर सोमवारी रात्री दहाच्या सुमारास बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
अंतरवाली येथे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व तेथे दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत अशा भातलवंडे यांच्या प्रमुख मागण्या आहेत. आंदोलनास्थळी स्थानिकासह परिसरातील लोकांनी दाखल पाठींबा दिला आहे.