उमरगा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर नियोजन व पूर्वतयारीसाठी आ. ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी शहरातील सर्व बालरोग तज्ज्ञांची तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी कोविडग्रस्त बालकांसाठी लागणारी औषधी मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यासोबतच बालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ज्या बालकांना कोरोना झालेला आहे, त्यांना प्राथमिक लक्षणे दिसून येत नाहीत किंवा सुरुवातीच्या काळात काहीच त्रास होत नाही. परंतु ५ ते ६ आठवड्यांच्या दरम्यान अनेक बालकांना पोस्ट कोविडची लक्षणे आढळून येऊन यात हृदय, किडनी, लिव्हर या अवयवांवर सूज येत असल्याची माहिती उपस्थित बालरोग तज्ज्ञ यांनी या बैठकीत दिली. यासाठी अशा बालकांवर व ज्यांच्या घरात कोविड रुग्ण होऊन गेलेले आहेत, अशा घरातील बालकांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा बालकांचा सर्व्हे करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले.
तसेच कोविडग्रस्त बालकांना लागणारी औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध करणे, बालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर तयार करणे, उपजिल्हा रुग्णालयात बालकांसाठी काही बेड राखीव ठेवणे आदी विषयांवर चर्चा झाली.
बैठकीस उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे, डॉ. सुहास साळुंखे, शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे, विधानसभा संघटक शरद पवार, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, डॉ. उदय मोरे, बालरोग तज्ज्ञ डॉ. सुभाष वाघमोडे, डॉ. दत्तात्रय थिटे, डॉ. सुचेता पोफळे, डॉ. प्रशांत मोरे, डॉ. नामदेव बिराजदार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, राजू साळुंके, डॉ. सचिन तावशीकर, उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. प्रवीण जगताप, डॉ. विनोद जाधव आदी उपस्थित होते.
चौकट........
समाज माध्यमांद्वारे करणार जनजागृती
आई-वडिलांनी त्यांच्या मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा झाला असल्यास काय काळजी घ्यावी, याबाबत बालरोग तज्ज्ञ व आशा कार्यकर्ती यांच्यात समन्वय ठेवणे. तसेच याची माहिती समाजमाध्यम व माहितीपत्रकाद्वारे गावोगावी पोहचवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच उपस्थित बालरोग तज्ज्ञांच्या सूचनेनुसार शासनदरबारी आवश्यक त्या बाबींच्या उपलब्धतेसाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आ. ज्ञानराज चौगुले यांनी यावेळी दिली.