उस्मानाबाद : दीड वर्षापासून कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. त्याचा उद्योग, व्यवसायावर परिणाम झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच पेट्रोल, डिझेलपाठोपाठ गॅस सिलिंडर, खाद्य तेलांच्या किमती वाढल्याने घराचे बजेट बिघडले आहे.
कोरोना संसर्गामुळे उद्योग, व्यवसाय बंद झाले होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. यातच पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढत चालल्या आहेत. शिवाय, स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. त्याचबरोबर खाद्यतेल, साखर, हरभरा, तूर, मूग डाळीचे दर वाढले आहेत. भाजीपाल्यांच्या दरातही सातत्याने चढ-उतार होत आहेत. त्यामुळे घरातील बजेट बिघडत आहे.
तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबांचा वाढलेला महिन्याचा खर्च
वस्तू वाढलेले खर्च
खाद्यतेल ३००
धान्य ४००
शेंगदाणे १००
साखर २५
साबुदाणा ४०
डाळ ३०
सिलिंडर गॅस १९१
पेट्रोल १५
डिझेल १३
एकूण १११४
अशी वाढली महागाई
जानेवारीतील सध्याचा
दर दर
पामतेल १२३ १३३
सोयाबीन तेल १५२ १५५
शेंगदाणा १०० १०७
साबुदाणा ४८ ५५
हरभरा डाळ ५८ ६५
तूर डाळ ८८ ९५
मूग डाळ ८८ ९५
चहापूड ३२५ ३२५
कमी तेलाची फोडणी
गेल्या वर्षापासून खाद्यतेलाच्या किमतीत वाढत आहेत. सर्वच तेलाचे दर दुपटीने वाढले असल्याने गृहिणींनी भाजी बनविताना खाद्यतेलाचा कमी वापर करीत आहेत.
सिलिंडर हजाराच्या घरात
मागील दीड-दोन वर्षांपूर्वी सिलिंडरचे दर ६०० रुपयांच्या जवळपास होते. तसेच त्यावर सबसिडीही १०० ते १५० रुपये मिळत. त्यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांनाही सिलिंडर परवडत होता.
मागील काही महिन्यांपासून सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे अनेक महिलांनी चुलीवर स्वयंपाक करण्यास पसंती दिली आहे. सप्टेंबर महिन्यात सिलिंडरचे दर ९०१ रुपये झाले.
गृहिणी म्हणतात...
कोरोनाकाळात हाताला काम नसल्याने आर्थिक संकटे उभे राहत आहेत. त्यातच सातत्याने जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत. शासनाने महागाईवर नियंत्रण ठेवावे.
-रेखा पांढरे, गृहिणी
पेट्रोल, डिझेलच्या दराबरोबरच गॅस सिलिंडर, खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. डाळी तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडत आहे.
-नीता सरवदे, गृहिणी