येणेगूर परिसरातील शेतकऱ्यांत चिंता
येणेगूर : उमरगा तालुक्यातील येणेगूरसह परिसरातील सुपतगाव, दावलमलीकवाडी, महालिंगरायवाडी, तुगाव, येणेगूर शिवारातील सोयाबीन, उडीद, मुग पिकांच्या कोवळ्या मोडावर गोगलगायी व पैसा किडीचा उपद्रव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
मृग व आर्द्रा नक्षत्राने हुलकावणी दिल्यानंतर पुनर्वसू नक्षत्राच्या दमदार पावसाने शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवून पेरण्या उरकल्या. परिसरात सध्या पिके कोवळ्या अवस्थेत आहेत. नेमके याच वेळी किडींचा उपद्रव वाढला आहे. उभी पिके गोगलगाय व पैसा ही किडी पाने कुरतडून खात असल्याने अनेक शेतकऱ्यांची जमीन पेरणी करून देखील काळी पडत असल्याचे चित्र आहे.
पेरणीसाठी एकरी बी-बियाणे, खत, औषधे व ट्रॅक्टरसाठी जवळपास दहा हजाराचा खर्च होतो. उशिराने केलेल्या पेरणीमुळे उत्पादनात घट निश्चित असतानाही शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने काळ्या आईची ओटी भरली. परंतु, या कीडीच्या हल्ल्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत. शेतकरी अंबादास येडगे यांनीही एकरी दहा हजाराचा खर्च करून उडिदाची पेरणी केली. उगवलेली पिके दोन पानावर असतानाच गोगलगायी व पैसा किडीने पीक खाऊन फस्त केल्याने दोन एकरात पेरलेले उडिद पिकाचे रान काळे पडल्याचे सांगितले. नुकसानभरपाईसाठी महसूल व विमा कंपनीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही येडगे यांनी केली आहे.
दरम्यान, यासंदर्भात कृषी सहायक नितीन चेंडकाळे व अतुल गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शेतातील गोगलगायी व पैसा वेचून रॉकेलमध्ये टाकावी किंवा कीटकनाशकाची फवारणी त्वरित करावी.