उस्मानाबाद : सत्ताधाऱ्यांत प्रचंड मतभेद आहेत़ मात्र, हात झटकण्याच्या बाबतीत ते एकसुरी आहेत़ काही झाले तरी केंद्राने करावे, हा त्यांचा सूऱ मदत जाहीर करायचे सोडून जीएसटी परताव्यावरुन कांगावा करीत सुटलेत़ आणि शरद पवार सध्या त्यांच्या ‘डिफेन्स’ची जबाबदारी सांभाळत असल्याचा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला़
नुकसान पाहणी दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांनी मंगळवारी सकाळी उस्मानाबाद येथे माध्यमांशी संवाद साधला़ यावेळी ते म्हणाले, अतिवृष्टीने पिके तर गेलीच, शेतीही खरवडून गेली आहे़ विहिरी गाळाने बुजल्यात़ पडझड झाली, लोकांचे जीव गेले़ या दीर्घकालीन नुकसानीच्या भरपाईसाठी विशेष योजना जाहीर केली पाहिजे़ ही वेळ राजकारणाची नाही, संवेदनशीलता दाखविण्याची आहे़ केंद्र सरकार निश्चितच चांगली मदत करेल, पण राज्य सरकारनेही मदत तातडीने जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी आ़राणाजगजितसिंह पाटील, आ़संभाजीराव पाटील, आ़अभिमन्यू पवार, जिल्हाध्यक्ष नितीन काळे उपस्थित होते़
कर्ज काढण्यात गैर काय?शरद पवारांच्या इतका जाणकार माणूस राज्यात नाही़ त्यांना सर्व नियम, कायदे चांगले ठाऊक आहेत़ तरीही ते मदतीसाठीची प्रक्रिया सांगत आहेत़ कर्ज काढावे लागेल, असे म्हणताहेत़ मग अशा संकटकाळात कर्ज काढण्यात गैर काय? राज्याची पत १ लाख २० हजार कोटी कर्ज घेण्याची आहे़ त्यामुळे जरुर कर्ज काढावे, असा सल्ला फडणवीस यांनी दिला़