धाराशिव : येथील जिल्हा परिषदेत आठ वर्षांपूर्वी केलेल्या एका आंदोलनावेळी माजी मंत्री बच्चू कडू यांनी पोलिसांचा अपमान केल्याचे सिद्ध झाले आहे. याप्रकरणी न्या.राजेश गुप्ता यांनी कडू यांना सोमवारी अडीच हजार रुपयांचा दंड ठोठावतानाच कोर्ट उठेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा सुनावली.
दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेल्या ३ टक्के निधीचा खर्च होत नसल्याने माजी मंत्री बच्चू कडू यांनी प्रहार पक्षाच्या वतीने नोव्हेंबर २०१५ मध्ये जिल्हा परिषदेत आंदोलन केले होते. घोषणाबाजी झाल्यानंतर ते आंदोलकांसह तत्कालीन मुख्य कार्याकरी अधिकारी आनंद रायते यांच्या केबिनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी तेथे उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी त्यांचा वाद झाला. या घटनेनंतर पोलिसांनी बच्चू कडू यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यामध्ये बेकायदेशीर जमाव जमविणे, लोकसेवकास त्यांच्या कर्तव्यापासून धाकाने रोखणे तसेच पोलिसांचा अवमान करणे अशी कलमे त्यांच्याविरुद्ध लावण्यात आली होती.
याप्रकरणाचा तपास पूर्ण धाराशिव पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. यावर सोमवारी अंतिम सुनावणी पार पडली. सरकार पक्षाच्या वतीने ॲड.महेंद्र देशमुख यांनी युक्तीवाद केला. तसेच आतापर्यंतच्या सुनावण्यांमध्ये सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे, तत्कालीन पोलीस अधिकारी, सीईओ यांच्या साक्षी लक्षात घेत न्या. गुप्ता यांनी बच्चू कडू यांना पोलिसांच्या अवमान प्रकरणी दोषी धरुन त्यांना कोर्ट उठेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा व अडीच हजार रुपये दंड सुनावला. बेकायदेशीर जमाव, शासकीय कामात अडथळा या कलमातून मात्र कडू यांना निर्दोष सोडले. उर्वरीत चार आरोपींनाही सर्वच कलमातून निर्दोष सोडण्यात आले.