उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील चिंचोली, निलेगांव, मानमोडी, सिदंगाव, बसवंतवाडी आदी गावातील गाय पारधी समाज बांधवांनी खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. उपोषणकर्ते कुटुंबासह शेळ्या, कोंबड्या, मांजर, कुत्रा अशा पाळीव प्राण्यांसह येथे दाखल झाले आहेत.
यावेळी उपोषण कर्त्यांनी सांगितले की, पारधी समाज गरीब असल्याने पोटाची खळगी भरण्याकरिता शेळी पालन, कुक्कुट पालन तसेच मजूरी करुन जीवन जगत आहे़ परंतु अद्यापही पारधी समाजाकडे गुन्हेगार म्हणून पाहिले जाते. यातच काहीजण मजूरी करुन उरनिर्वाह करणाऱ्या गरिब गाय पारधी समाजातील व्यक्तींना गुन्हेगार ठरवून त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करतात. यामुळे अशा कुटुंबांना जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होत आहे. अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, गुन्हे दाखल करण्यात आलेल्या कुटुबांना न्याय मिळवून द्यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.