धाराशिव : रस्ते, जमीन, वीज व पाणी अशा उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधांची पूर्तता धाराशिव जिल्ह्यात झाली आहे. यामुळे मोठ्या गुंतवणुकीची आस येथील औद्योगिक वसाहतींना लागून आहे. कौडगाव एमआयडीसीत टेक्निकल टेक्स्टाइल पार्क नियोजित असून, सरकारने प्रयत्नपूर्वक येथे उद्योग आणण्याची अपेक्षा जिल्हावासीयांना आहे.
हवा, पाणी आणि तुळजाभवानी असा उपहास अलीकडच्या काही वर्षांपर्यंत धाराशिव जिल्ह्याचा होत राहिला आहे. मात्र, आता हे रूपडे पालटले असून, जिल्ह्यातून खामगाव-पंढरपूर, सोलापूर-धुळे, सोलापूर-हैदराबाद व रत्नागिरी-बुटीबोरी असे चार राष्ट्रीय महामार्ग पूर्णत्वाकडे गेले आहेत. याशिवाय, सुरत-चेन्नई ग्रीनफिल्डसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. शक्तिपीठ ते भक्तिपीठ असा महामार्ग जिल्ह्यातून जात आहे. सोलापूर-तुळजापूर-धाराशिव मार्गामुळे रेल्वेचे जाळेही समृद्ध होत आहे. पवन व सोलार ऊर्जानिर्मितीही मोठ्या प्रमाणात होत आहे. जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. कृष्णा मराठवाडा प्रकल्पाद्वारे लवकरच मुबलक पाणी उपलब्ध होईल. कुशल-अकुशल मनुष्यबळ मोठे आहे. अर्थात उद्योगांसाठी ज्या प्राथमिक गरजा असतात, त्या पूर्णपणे धाराशिवमध्ये उपलब्ध आहेत. अशा स्थितीत राज्य सरकारने येथे मोठ्या गुंतवणुकीचे प्रकल्प प्राधान्यक्रमाने आणणे गरजेचे आहे. सध्या कौडगाव एमआयडीसीत टेक्निकल टेक्स्टाइल पार्क नियोजित आहे. सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेला हा उद्योग प्रचंड रोजगारनिर्मिती करणाराही आहे. या उद्योगासाठी कौडगाव एमआयडीसीत ९२३ एकरापैकी ४४९ एकर क्षेत्र राखीव ठेवले गेले आहे. या क्षेत्रातील उद्योग येथे आणण्यासाठी राज्य सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
आकांक्षित जिल्ह्याकडे हवा फोकसधाराशिव जिल्हा हा देशातील आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य सरकारने विशेष लक्ष पुरवून येथील उद्योगवृद्धीसाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. शिक्षण, आरोग्य, सिंचन या तीन ट्रीगरमध्ये जिल्ह्याची प्रगती सुरू असली तरी त्यासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून द्याव्यात. उच्चशिक्षणाची सोय येथेच व्हावी, यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी धाराशिवकरांची प्रलंबित आहे. त्यावरही गतीने निर्णय अपेक्षित आहे. कृष्णा मराठवाडा योजनेचे पाणी लवकर मिळण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद सरकारकडून अपेक्षित आहे.