उस्मानाबाद : बंगळुरूत सुरू असलेल्या आयपीएल मेगा लिलावात भारतास विश्वविजेतेपद पटकावून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाने तब्बल १.५ कोटी मोजत उस्मानाबाद जिलह्यातील तुळजापूरचा राजवर्धन हंगरगेकरला संघात घेतले आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये चाललेल्या अतिशय चुरशीच्या लिलावात मुंबई इंडियन्सने माघार घेतली.
आशिया चषक आणि १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील दमदार कामगिरीनंतर उस्मानाबादचा स्टार अष्टपैलू क्रिकेटर राजवर्धन हंगरगेकरने जागतिक क्रिकेट जगतात वेगळी छाप निर्माण केली. राजवर्धनच्या भेदक गोलंदाजीसह झंझावाती फलंदाजीची जगभर चर्चा सुरू असतानाच बंगळुरूत सुरू असलेल्या आयपीएल मेगा लिलावात राजवर्धनला ३० लाख एवढी मूळ किंमत ठेवण्यात आली होती. मुंबई इंडियन्सने राजवर्धन संघात घेण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम बोली लावली. यातच मुंबई इंडियन्सने लावलेली बोली पाहता लखनौ सुपरजायंट्सच्या संघाने त्याच्या लिलावात उडी घेतली. यातच मुंबई आणि लखनौमध्ये चाललेल्या चुरशीच्या लिलावात चेन्नई सुपर किंग्स संघानेही उडी घेत १ कोटीपर्यंत चाललेल्या बोलीत मुंबई इंडियन्सने अखेर माघार घेतली. तर चेन्नई सुपर किंग्सने राजवर्धनला १.५ कोटी रुपये माेजून आपल्या संघात सहभागी करून घेतले.
आर. अश्विनने केला होता दावा.....
आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात भारतीय अंडर-१९ संघाचा वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकरवर सर्व फ्रँचायझींची नजर असल्याचे भाकीत आर. अश्विनने केले होते. त्याने राजवर्धनच्या गोलंदाजीची तुलना भारतीय वेगवान गोलंदाज ईशांत शर्माशी केली होती. अश्विनच्या दाव्यानुसार राजवर्धनच्या गोलंदाजीच्या क्षमतेमुळे तसेच शेवटच्या काही षटकांमध्ये आक्रमक खेळी करणाऱ्या राजवर्धनच्या संदर्भात संघांमध्ये संघर्ष होऊ शकतो. चेन्नई सुपर किंग्सच्या माध्यमातून आयपीएलमध्ये एन्ट्री मारलेला राजवर्धन हंगरगेकर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ससारख्या बलाढ्य संघात खेळणार आहे.