कोविडच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व काही उपकेंद्राच्या माध्यमातून लसीकरण कार्यक्रम राबवला जात आहे. यासाठी त्या-त्या ठिकाणच्या वैद्यकीय अधिकारी व कोल्ड चेन हॅण्डलरकडे लस साठा सुपूर्द केला जातो. यानंतर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार लसीकरण राबवणे अपेक्षित असते.
परंतु, दहिफळ येथील सामाजिक कार्यकर्ते पोपट पाटील यांनी आपल्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणात काही अनियमितता झाल्या असल्याची तक्रार तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे केली आहे. यामध्ये ऑनलाईन नोंदणी करूनच लसीकरण करणे गरजेचे असताना काही व्यक्तींना ऑफलाईन लस देण्यात आल्याचा मुद्दा त्यांनी मांडला आहे. तसेच दहिफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात किती लस आली, ती कोणाला दिली, त्यांचा वयोगट काय याचीही माहिती आरटीआय नुसार मागितली असून, याप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या तक्रारीनंतर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाने तत्काळ एका कर्मचारी करवी दहिफळ येथे जाऊन चौकशी केली. या ठिकाणचा प्राप्त लस साठा, झालेले लसीकरण, नोंदणी याची त्यांनी पाहणी केली आहे. यास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीपकुमार जाधव यांनीही दुजोरा दिला आहे.