लोहारा : तालुक्यातील माकणी येथे लोकसहभागातून सुरू करण्यात येणाऱ्या आयसोलेशन केंद्राच्या उभारणीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी या कामाची पाहणी केली. तसेच लोकसहभागातून असे आयसोलेशन केंद्र सुरू करणारी जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत असल्याचे सांगून या केंद्रासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवेची मदत करू, असे ते म्हणाले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत माकणी येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत १५० पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण निष्पन्न झाले असून, यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या येथे ५० पेक्षा जास्त ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. येथील रुग्णांना लोहारा, तुळजापूर, उस्मानाबाद येथे नेण्यात येत आहे. परंतु, तेथेही वेळेवर बेड, औषधे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेत गावातच कोरोना रुग्णांची सोय व्हावी या हेतूने बी.एस.एस. कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रशस्त इमारतीत लोकसहभागातून २५ बेडची व्यवस्था असलेले आयसोलेशन केंद्र उभारले जात आहे. येथे २५ बेडची व्यवस्था, पाणी, शौचालय, अंघोळीची सोय, लाईटची व्यवस्था याची पाहणी करून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी सरपंच तथा कोरोना दक्षता समितीचे अध्यक्ष विठ्ठल साठे, उपसरपंच वामन भोरे, माजी उपसरपंच दादासाहेब मुळे, ॲड. दादासाहेब जानकर, उमेश कडले, प्रा. सिद्धेश्वर साठे, संजय साठे, किशोर चिकंद्रे, पंडित ढोणे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, सुभाष आळंगे, ओमकार साठे, बाळू कांबळे, अच्युत चिकुंद्रे, अभिमन्यू कुसळकर, सरदार मुजावर, तलाठी वाजिद मणियार, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मनाळे, आदी उपस्थित होते.
फोटो - लोहारा तालुक्यातील माकणी येथे लोकसहभागातून उभारण्यात येत असलेल्या आयसोलेशन केंद्राची पाहणी करताना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक कटारे. समवेत सरपंच विठ्ठल साठे, उपसरपंच वामन भोरे, दादासाहेब मुळे, ॲड. दादासाहेब जानकर, आदी उपस्थित होते.