उस्मानाबाद : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. पावसाळ्यातील एकूण सरासरीच्या सुमारे १४ टक्के पाऊस हा या दोन दिवसांतच कोसळला आहे. यामुळे प्रकल्पातील पाणीपातळी वाढण्यास मदत झाली असली तरी खरीप पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३७.७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. शनिवारी रात्री भूम-परंडा तालुक्यात अतिवृष्टी झाल्यानंतर रविवारी रात्री उमरगा तालुक्यात वरुणराजा धो-धो बरसला. सोबतच पुन्हा भूम, परंडा व वाशी तालुक्यात दुसऱ्या दिवशीही दमदार हजेरी लावली. या तिन्ही तालुक्यात ४० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर उमरगा तालुक्यातील चार मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. उस्मानाबाद व कळंब तालुक्यात तुलनेने सर्वात कमी पाऊस झाला आहे. उस्मानाबादला २३ मिलीमीटर तर कळंब तालुक्यात १७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तुळजापूर तालुक्यात ३६, लोहारा ३० मिमी पाऊस झाला आहे. उमरगा तालुक्यात सर्वाधिक ७२ मिमी पावसाची नोंद आहे. भूमला ४५, परंडा ४१ तर वाशी तालुक्यात ५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात सोमवारी ३७ मिमी पावसाची नोंद झाली. तर जूनपासून आजपर्यंत ५८८.७० मिमी पाऊस झाला आहे.
९७ टक्के झाला पाऊस...
जिल्ह्यात पावसाळ्यात पडणारा सरासरी पाऊस ६०३ मिमी इतका आहे. त्या तुलनेत आतापर्यंत ५८८ मिमी पाऊस झाला आहे. याची टक्केवारी ९७.६१ इतकी भरते. दरम्यान, यातील १४ टक्के पाऊस हा मागील दोन दिवसांतच झाला आहे. शनिवारी रात्रीतून ८ टक्के पाऊस झाला. तर सोमवारी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची नोंद ही ६ टक्के इतकी आहे.
थोडी खुशी, थोडा गम...
गेल्या दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे भूम, परंडा, वाशी, तुळजापूर व उमरगा तालुक्यातील बहुतांश प्रकल्पात चांगला जलसाठा झाला आहे. अनेक प्रकल्प ओव्हरफ्लोही झाले आहेत. आणखीही पाण्याची आवक या प्रकल्पात सुरुच आहे. उर्वरित तालुक्यातील प्रकल्पांना अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, एकीकडे प्रकल्प भरत असल्याने खुशी असली तरी खरीप हंगामाचे आधी पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे अन् आता अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे.
इथे झाली अतिवृष्टी...
जिल्ह्यातील ४ मंडळांमध्ये सोमवारी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यातील तीन उमरगा तालुक्यातील आहेत. वाशी तालुक्यातील पारगाव येथेही अतिवृष्टी झाली असून, ६७.७५ मिमी पावसाची नोंद झाली. उमरगा तालुक्यातील मुळज ८४, नारंगवाडी ७६ तर उमरगा मंडळात ९० मिमी पावसासह अतिवृष्टी नोंदली गेली.