उस्मानाबाद - कोरोनाचा संसर्ग ओसरल्यानंतर शासनाने पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले; परंतु जबाबदारी आणि वेळ निश्चित न केल्यामुळे शिक्षकांत संभ्रमाचे वातावरण होते. याबाबत बुधवारी लोकमतने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शाळांची वेळ आणि शिक्षकांची जबाबदारी निश्चित करणारे पत्र काढले.
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाने पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले. हे वर्ग सुरळीत झाल्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले. शाळांची टायमिंग आणि जबाबदारी निश्चितीकरण स्थानिक शिक्षण विभागावर सोपविले होते. मात्र, शाळा सुरू होऊनही शिक्षण विभागाने ना शाळांची वेळ निश्चित केली ना गुरुजींची जबाबदारी. परिणामी शिक्षकांत संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान, शिक्षण विभागाने शाळांनाची वेळ निश्चित करावी, यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीस अन्य संघटनांकडून निवेदने देण्यात आली, तरीही काहीच कार्यवाही झाली नाही. हा प्रकार समोर आल्यानंतर ‘लोकमत’ने ‘निवेदनावर निवेदने, शिक्षण विभाग हलेना’ या मथळ्याखाली बुधवारी वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तामुळे खडबडून जाग्या झालेल्या शिक्षण विभागाने शाळांच्या वेळा निश्चित करून संभ्रम दूर केला.
चौकट...
अशी असेल शाळांची वेळ...
पाचवी ते बारावी वर्गाच्या शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. या गुरुजींनी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत शाळेवर थांबणे बंधनकारक केले आहे. चार तासांच्या तासिका झाल्यानंतर उर्वरित वेळेत अध्यापनाच्या नियोजनाची कार्यवाही करावी लागणार आहे.
अध्यक्षांनी काढली खरडपट्टी...
शाळांच्या वेळेच्या अनुषंगाने लोकमतने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी शिक्षण अधिकारी डॉ. मोहरे यांची खरडपट्टी काढली. नियोजनाअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या, अशा शब्दात सुनावले.