धाराशिव : ग्रामपंचायतीच्या कामसंदर्भात संबधित ठेकेदाराकडून सुमारे १ लाख रूपये लाच स्वीकारताना परांडा तालुक्यातील रोहकल ग्रामपंचायत सरपंचपतीला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई जिल्हा परिषद उपहारगृहात गुरुवारी सकाळी करण्यात आली.
परांडा तालुक्यातील रोहकल गावातील जवळपास तीन वस्त्यांसाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून सौरऊर्जेवर आधारित दुहेरी नळपंप योजना मंजूर झाली होती. हे काम मेनकर एनर्जी प्रा. लि. या कंपनीला मिळाला होते. मात्र सरपंचपती हनुमंत कोलते यांनी हे काम थांबविले होते. दरम्यान, संबंधित काम पूर्ववत सुरू करण्यासाठी तक्रारदारास २२ मार्च रोजी तिन्ही कामांपोटी प्रत्येकी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली.
पैसे देणार नसाल तर सोलारच्या तीन प्लेट आणि त्यासाठी लागणारे साहित्य देण्याची मागणी केले होती. दरम्यान, तडजोडीअंती १ लाख रुपये देण्याचे ठरले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने ठेकेदाराच्या वतीने 'लाचलुचपत'कडे तक्रार दिली. तक्रारीत सत्यता पडताळून गुरुवारी जिल्हा परिषदेच्या उपहारगृहात सापळा लावला. यावेळी तक्रारकर्त्याकडून सुमारे १ लाखांची लाच स्वीकारताना सरपंचपतीला रंगेहात पकडण्यात आले. नूतन पोलीस उपअधीक्षक सिद्धराम म्हेत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.