धाराशिव : पालकमंत्र्यांच्या बुधवारी झालेल्या आढावा बैठकीला जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हता. बैठकीकडे केलेली ही पाठ शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागली असून, पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी लागलीच पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर टीकेचे बाण चालविले.
पालकमंत्री तानाजी सावंत हे दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर होते. यात बुधवारी त्यांनी धाराशिव येथे आढावा बैठक घेतली. याकडे कोणीही लोकप्रतिनिधी फिरकले नाहीत. यामुळे संतप्त सहसंपर्कपप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, दत्ताआण्णा साळुंके यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना मांडल्या. हे पदाधिकारी म्हणाले, ज्या लोकप्रतिनिधींना लोकांनी त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी, विकासाला गती देण्यासाठी निवडून दिले आहे, ते लोक महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवतात, हे चुकीचे आहे. ही पदे काय केवळ चमकोगिरी करण्यासाठी त्यांना लोकांनी दिली आहेत का, असा सवालही त्यांनी केला. ज्ञानराज चौगुले हे प्रश्नांची यादी देऊन परवानगीनेच अनुपस्थित होते. मात्र, इतर एकही लोकप्रतिनिधी तसे वागत नाहीत. केवळ पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या नावाने बोंबा ठोकायच्या, इतकेच काम सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. कोनशिलेवरील नावाचे प्रकरण समजल्यानंतर आम्ही शांत बसणारे नव्हतो. मात्र, सावंत यांनीच विकासकामाला गालबोट लागेल, असे कोणतेही कृत्य तेथे होऊ नये, असे सांगितल्याने शांत राहिलो, असे या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.