पाथरूड : भूम तालुक्यातील पाथरूड येथील वीज उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंता पद मागील आठ महिन्यांपासून रिक्त असल्याने येथील कारभार प्रभारींवर सुरू आहे. यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या उपकेंद्रांतर्गत पाथरूड. आंबी आणि वालवड या तीन उपकेंद्रांसाठी कनिष्ठ अभियंता पद कार्यान्वित आहे. या पदावर कार्यरत असलेल्या खताळ यांची आठ महिन्यांपूर्वी बदली झाली. यानंतर येथील पदभार माणकेश्वर येथे कार्यरत असलेले पवार यांच्याकडे देण्यात आला. तेव्हापासून आजवर हे पद भरण्यात आलेले नाही. पवार यांच्याकडे माणकेश्वर येथील पदभार असल्याने ते पाथरूडसाठी अपेक्षित वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे तीन उपकेंद्रांतर्गत असलेल्या ३६ गावांतील विजेसंदर्भातील अनेक प्रश्न रेंगाळत आहेत.
कर्मचाऱ्यांचीही पदे रिक्त
पाथरुड, आंबी, वालवड या तीनही ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत घरगुती व उद्योगाचे साडेसहा हजार, तर कृषी साडेचार हजार असे एकूण जवळपास ११ हजार ग्राहक आहेत. ईट, खर्डा, देवगाव गावापर्यंत येथील विद्युत लाइन विस्तारलेली आहे. परंतु त्या तुलनेत कर्मचारी संख्या कमी आहे. एकेका विद्युत कर्मचाऱ्यांकडे पाच ते सहा गावांचा भार असल्याने वेळेवर बिघाड दुरुस्त न झाल्यास ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. थोडासा पाऊस झाला तरी कुठे ना कुठे बिघाड होऊन वीज गायब होते. अशा वेळी मनुष्यबळ कमी असल्याने बिघड दुरुस्त होण्यास विलंब लागत आहे.