लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : येथील कोषागार कार्यालयामध्ये लेखा व कोषागार दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्यविषयक तपासणी, कार्यालयाची सजावट, उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार वितरण, गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा आणि कोविड कालावधीमध्ये चांगले काम केल्याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
सकाळ सत्रातील कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले-डंबे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून करण्यात आले. दुपार सत्रातील कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी कोषागार अधिकारी सचिन संदिपान इगे होते. कार्यक्रमाला परिविक्षाधीन अधिकारी अमोल आमले, लेखाधिकारी आप्पासो पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी उपस्थित होते.
यानिमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचा ७० अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. सूत्रसंचालन पूजा दळवे यांनी केले तर प्रास्ताविक अपर कोषागार अधिकारी नीलेश साखरे यांनी केले. अपर कोषागार अधिकारी चंद्रशेखर काजळे यांनी आभार मानले.