(फोटो
: उन्मेष पाटील १५)
कळंब : शहरामध्ये मागील दोन दिवसांपासून नळाद्वारे पिवळे व दुर्गंधीयुक्त पाणी येत असून, या पाण्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे नगर परिषदेने शहरवासीयांना स्वच्छ पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा शहर शिवसेनेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
कळंबकराना या पूर्वीही काळे पाणी येत होते. मातीमिश्रीत काळसर पाणी नागरिकांना नाईलाजाने प्राशन करावे लागले होते. वितरण व्यवस्थेतील दोषामुळे अनेक भागात पाणी पोहचतच नाही. सध्या दोन-तीन दिवसांपासून शहरात पिवळे पाणी येत आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अगोदरच कोरोनाची भीती सर्वांच्या मनात आहे. त्यातच पालिकेकडून अशुध्द पाणीपुरवठा होऊ लागल्याने स्वच्छ पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर न.प. तील शिवसेनेचे गटनेते शिवाजी कापसे, श्याम खबाले, राजाभाऊ जंत्रे, प्रदीप मेटे, नगरसेवक सतीश टोणगे, प्रताप मोरे, संजय घुले, अजित गुरव, किरण राजपूत, विकास कदम, युवा सेना शहरप्रमुख गोविंद चौधरी, विठ्ठल जाधव, डॉ. रुपेश कवडे, राजाभाऊ गरड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.