कळंब शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. यातील बहुतांश गंभीर रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना योग्य आहाराची गरज असते. यामुळे यापुढे उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांच्या दोनवेळच्या भोजनासह नाश्त्याची जबाबदारी शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांनी उचलली आहे.
यासंदर्भात कळंब येथील तहसीलदार रोहन शिंदे यांना शिवाजी कापसे यांनी स्वतः भेटून पत्र दिले आहे. यावेळी मंडळ अधिकारी तुळशीराम मटके, युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख सागर बाराते यांची उपस्थिती होती.
कापसे यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेतही त्यांनी शेकडो गोरगरीब, गरजवंत लोकांना भोजन पुरवले होते. यासाठी कळंब येथे अविरत भोजनकक्ष चालू केला होता. यंदाही उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या सकाळ, संध्याकाळच्या जेवणासह नाष्ट्याचा भार त्यांनी उचलला आहे. तालुक्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असून, शहरासह ग्रामीण भागातील नेतेमंडळी स्तब्ध आहे. अशा स्थितीत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांनी मदतीसाठी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असा आहे.