उस्मानाबाद : तालुक्याच्या सरहद्दीवर असेल्या करजखेडा (जुनेगाव) जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत बिकट होती. मात्र, मागील तीन-चार वर्षांत गुरूजी, शिक्षण समिती आणि ग्रामस्थांनी एकत्र येत केलेल्या प्रयत्नांमुळे शाळेचे रूपडे बदलले. एवढेच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आलेखही उंचावला. गुणत्तेचा उंचावलेला आलेख पाहून इंग्रजी शाळांच्या प्रेमात पडलेले पालक पाल्यांना पुन्हा ‘झेडपी’ शाळेत दाखल करू लागले आहेत. वर्षभरात सात ते आठ विद्यार्थी परतले.
साधापणे २०१६ पूर्वी करखेडा जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी शाळा परिसरात व्यवस्थित मैदानही नव्हते. दरम्यान, याच काळात शासनाने शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या केल्या. या प्रक्रियेतून शाळेला माहिती-तंत्रज्ञानाची गोडी असणारे गुरूजी मिळाले. रूजू होताच शिक्षकांनी शाळेचे रूपडे बदलण्याचा निर्धार केला. पालक आणि शिक्षण समितीच्या माध्यमातून सुरूवातीला १५ हजार रूपये लोकवाटा जमा केला. या पैशातून स्पीकर संच घेण्यात आला. यानंतर शाळेच्या रंगरंगोटीचा निर्णय घेण्यात आला. याकरिता शाळेसाठी निधीची तरतूद नसल्याने पुन्हा लोकवाटा जमा केला.
शिक्षक शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थही पुढे आले. लोकवाट्यातून जवळपास २५ हजार रूपये जमा झाले. यातून शाळेची बाह्य सजावट केली. भींतीवर प्राणी, पक्षी, नकाशे रेखाटण्यात आले. याला जोड म्हणून शाळा परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. हे सर्व करीत असताना विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर विशेष लक्ष दिले गेले. याचा परिणाम म्हणून की काय, शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षेत ऋतुजा ज्ञानेश्वर आदटराव ही विद्यार्थिनी यशस्वी झाली. यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेतही तीन मुलींनी झेप घेतली. दिवसागणिक उंचावणारा शाळेचा हा आलेख पाहून इंग्रजी शाळेकडे आकर्षित झालेले पालक पुन्हा जिल्हा परिषद शाळेकडे वळले. चालू शैक्षणिक वर्षात जवळपास सात ते आठ विद्यार्थी इंग्रजी शाळातून ‘झेडपी’ शाळेकडे परतले आहेत. या कामी शिक्षक शेख शायर अली, सहशिक्षक डी. एस. लोकरे, आर. ई. जाधव, जी. ए. सोनटक्के, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खंडू शिंदे यांनी पुढाकार घेतला.
विद्यार्थ्यांना मोफत धडेजिल्हा परिषद शाळेत लोकसहभागातून जवळपास चार संगणक संच उपलब्ध करण्यात आले आहेत. शाळेवरील जवळपास सर्वच शिक्षकांनी ‘एमएस-सीआयटी’चे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. हेच गुरूजी आता पहिली ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. अशा स्वरूपाचे मोफत प्रशिक्षण देणारी ही जिल्ह्यातील ‘झेडपी’ची पहिली शाळा असल्याचा दावा मुख्याध्यापक शेख शायर अली यांनी केला आहे.
हेही उपक्रम ठरताहेत फायदेमंदजिल्हा परिषदेकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये ‘छत्रपती शाहु महाराज बचत बँक, पाच रूपयांत एक महिना वर्तनपत्र वाचा’ आदी उपक्रमांचा समावेश आहे. हे उपक्रमही विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे ठरत आहेत, असे शिक्षकांकडून सांगण्यात आले.