उस्मानाबाद : ‘गाँव जले, हनुमान बाहर’ शी एक म्हण ग्रामीण भागात चांगलीच प्रचलित आहे़ अगदी त्याचाच प्रत्यय पाटबंधारेच्या अभियंत्यांनी नुकताच आणून दिला आहे़ परंडा तालुक्यातील खंडेश्वरी तलाव पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर असताना अधिकारी नॉट रिचेबल होते़ यामुळे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना तडक नोटिस काढून कारवाईचा इशारा दिला आहे़
परंडा तालुक्यातील खंडेश्वर मध्यम प्रकल्पाच्या पाळूला काही दिवसांपूर्वीच ७० ते ८० फूट अंतराच्या भेगा पडल्या होत्या़ त्यावेळी सांडवा फोडून पाणी सोडून देण्यात आले होते़ जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी २ आॅक्टोबर रोजी स्वत: भेट देऊन पाणी सोडण्याच्या व अहवाल सादर करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला केल्या होत्या़ यानंतर आता परतीच्या पावसामुळे पुन्हा पाण्याची आवक वाढून तलावाला धोका निर्माण झाला आहे़ पाऊस वाढू लागल्याने तलावाखालीत भागात राहणाऱ्या गावातील लोक भयभीत झाले आहेत़ अशावेळी आवश्यक कारवाई करण्याचे सोडून पाटबंधारे विभागाने परंडा तहसीलदारांना पत्र देत धोक्याचा इशारा गावकऱ्यांना देण्याबाबत कळविले़
यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी कार्यकारी अभियंता स़स़ आवटे तसेच उपविभागीय अभियंता एस़बी़ पाटील यांच्याकडून स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला़ मात्र, हे दोन्ही अधिकारी १० व ११ आॅक्टोबर या दोन दिवशी ‘नॉट रिचेबल’ होते़ एकिकडे तलावाच्या संदर्भाने धोक्याची स्थिती निर्माण झालेली असताना हे दोघेही बेफिकीर आढळून येत आहेत़ आपल्या जबाबदारीचे पालन न केल्यामुळे आपल्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाचे कलम ५१ व भारतीय दंड विधानाचे कलम १८८ अन्वये कारवाई का करु नये, अशी विचारणा करणारी नोटिस निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी जारी केली आहे.