यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सोयाबीन पिकाचे घरगुती बियाणे उगवण क्षमता तपासणी करूनच वापरावे, बियाणे पेरणीपूर्वी त्यास जैविक व रासायनिक बीजप्रक्रिया करावी, पेरणी बी.बी.एफ. यंत्रानेच करावी, पहिली फवारणी निंबोळी अर्काची करावी, अशी माहिती प्रात्यक्षिकासह दिली. शेतकऱ्यांनी उत्पन्नात वाढ करण्याबरोबरच उत्पन्न खर्च कमी करण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पोक्रा योजनेअंतर्गत फळबाग लागवड, रेशीम उद्योग, बांबू लागवड, विहीर पुनर्भरण याबाबतची माहिती प्रकल्प विशेषज्ञ सचिन पांचाळ यांनी दिली. शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून औजार बँक, प्रक्रिया उद्योग यांची स्थापना करण्याविषयी प्रकल्प विशेषज्ञ नेताजी चव्हाण यांनी माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान कृषी पर्यवेक्षक दत्तात्रय मोहिते व तानाजी हिप्परकर, कृषी सहायक माजीद शेख व धवल शिणगारे यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले.