उस्मानाबाद : कामाचे आमिष दाखवून भूम तालुक्यातील हिवर्डा येथील तिघा मुलांना पळवून नेल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी गुरूवारी भूम पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, हिवर्डा येथील ओम दादासाहेब मुंढे, महेश बबन मुंढे व शंकर दत्तात्रय मुंढे हे तिघे विद्यार्थी बुधवारी पाथरूड येथे शाळेत गेले होते. या तिघांनाही भूम तालुक्यातील पाटसांगवी येथील आप्पा राजवण व जामखेड तालुक्यातील रोडेवाडी येथील सुमंत डोके यांनी कामाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. संबंधित दोघांपासून मुलांच्या जीवितास धोका आहे, अशा स्वरूपाची तक्रार दादासाहेब श्रीमंत मुंढे (रा. हिवर्डा) यांनी भूम पोलीस ठाण्यात गुरूवारी दाखल केली. त्यावरून राजवण व डोके यांच्याविरूद्ध भादंविचे कलम ३६३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.