सचिन जवळकोटे
बलसूर, ( जि. उस्मानाबाद ) : 'पंचवीस वर्षांपूर्वी भूकंपानंतर केलेल्या माझ्या कामाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथील भूकंपग्रस्तांनी सोहळा आयोजित केला असला तरी मीच उलट सर्वांचं आभार मानतो; कारण त्यावेळी भूकंपग्रस्तांनी दाखवलेली जगण्याची उमेद मलाही माझ्या संकटात सामना करण्यासाठी बळ देऊन गेली. भूकंपग्रस्तांमुळेच उलट मला जगण्याचे बळ मिळाले,' अशा भाषेत शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, त्यांच्या दाढेच्या कर्करोग आजारावर त्यांनी प्रथमच सार्वजनिक ठिकाणी खुलेआमपणे भाष्य केलं.
30 सप्टेंबर 1993 रोजी झालेल्या प्रलयंकारी भूकंपाला आज पंचवीस वर्षे पूर्ण झाली. त्या वेळचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी काही दिवस या ठिकाणी मुक्काम ठोकून भूकंपग्रस्तांना ज्या पद्धतीने धीर दिला होता, त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेतली होती. त्या प्रती भावना व्यक्त करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पाठीमागे भल्या मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, 'तुमच्यामुळेच जगण्याचे बळ मिळाले !' त्या खाली फोटो होता शरद पवारांचा. बाजूला शिवराज पाटील-चाकूरकर, पद्मसिंह पाटील अन् विलासराव देशमुख यांचे फोटो होते.
सोहळ्यात सर्वच वक्त्यांनी भूकंपग्रस्त भागात शरद पवारांनी केलेल्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. शेवटी पवारांचे भाषण सुरू झाले. मात्र, त्यांनी अत्यंत भावनिक होत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संकटाला प्रथमच जगजाहीर केलं. 2004 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविताना डॉक्टरांनी त्यांना दाढेचा कॅन्सर असल्याचं निदान केलं होतं. ती आठवण शरद पवार सांगत असताना मंडपातलं अवघं वातावरण जणू स्तब्ध झालं, 'डॉक्टरांनी त्यावेळी माझ्यावर शस्त्रक्रिया केली. काही दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो. सकाळी-संध्याकाळी सीनियर डॉक्टर असायचे. दुपारी एक जुनियर डॉक्टर होता. पण एके दिवशी बोलता-बोलता त्यानं एके दिवशी मला सांगितलं की तुम्ही फक्त सहा महिन्यांचेच आहात. तेव्हा वाटणी-बिटणी काय करून घ्यायचं असेल तर करून घ्या. हे ऐकून मी उलट त्याला विचारलं, तुझं वय किती ? डॉक्टरनं सांगितलं 28. तेव्हा मी त्याला म्हणालो, तुमच्या वयाच्या दुप्पट मी जगणार. अन् त्यावेळी तुम्हाला काही अडचण आली तर मला फोन करा. कारण ज्या आत्मविश्वासानं मी बोलत होतो, ती जगण्याची उमेद मला भूकंपग्रस्त भागातील लोकांनी पंचवीस वर्षांपूर्वीच दिली होती. एकाच घरातील सातपैकी सहा माणसं ढिगाऱ्याखाली दगावली, तरीही वाचलेला एकटा माणूस आजपर्यंत ज्या जिद्दीनं जगत आलाय, तेच माझ्या जगण्याचंही बळ ठरलंय.'
पवार आपल्यावर येऊन गेलेल्या संकटाची माहिती देत असताना त्यांच्या पाठीमागच्या पॅनलवर एक वाक्य मोठ्या दिमाखानं झळकत होतं, 'तुमच्यामुळेच जगण्याचे बळ मिळाले !' ते वाचताना अन पवारांना अनुभवताना अनेकांच्या डोळ्यासमोर एक वेगळंच वाक्य तरळून गेलं, ते म्हणजे.. 'भूकंपग्रस्तांमुळेच शरद पवारांच्या जगण्याला बळ मिळाले !'