(फोटो : अजीत चंदनशिवे १७)तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील मातंगी देवी मंदिर परिसरात भाविकांसह, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी घेतलेला बोअर नादुरुस्त झाल्याने या भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे, तसेच मंदिर परिसरात असलेल्या स्वच्छतागृहाची वेळोवेळी स्वच्छता केली जात नसल्याने दुर्गंधी पसरली असून, भाविकांसह, स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामीनी असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येथे राज्यासह देशाच्या विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक येतात. यातील बहुतांश भाविक हे श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर मातंगी देवीच्या दर्शनासाठी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिर पाठीमागे असलेल्या मंदिरात जातात. यामुळे येथेही भाविकांची नेहमीच गर्दी पहावयास मिळते. येथे नवसपूर्ती, देवकार्य करण्यासाठी भाविक येतात; परंतु येथे आलेल्या भाविकांना ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे ना चांगल्या स्वच्छतागृहाची. विशेष म्हणजे या परिसरात विजेचीदेखील सोय करण्यात आलेली नाही. यामुळे भाविकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. देवकार्य करण्यासाठी आलेल्या भाविकांना येथे आल्यानंतर पाण्याचा शोध घ्यावा लागतो किंवा विकतच्या पाण्यावर कार्यक्रम उरकावा लागत आहे.
दरम्यान, यासंदर्भात भीम नगर येथील युवकांनी नगरपालिकेकडे स्वछतागृहाची स्वछता राखण्यासाठी कायमस्वरूपी कर्मचारी नेमावा, तसेच नादुरुस्त असलेले बोअरवेल तत्काळ दुरुस्त करून भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्यावी, लाईटची व्यवस्था करावी, मंदिर परिसराची स्वछता राखावी आदी मागण्याचे निवेदन दिले आहे. यावर सागर कदम, किरण कदम, संजय कदम, गोकुळ कदम, अरुण कदम, योगेश सोनवणे, हिरा भालेकर, राहुल सोनवणे, शुभम कदम, आदित्य कदम, बलभीम कदम, प्रीतम कदम, सुशील कदम, मयूर कदम, अजय कदम आदींच्या सह्या आहेत.