येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दहिफळ परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांत घबराट निर्माण झाली असून बाभळगाव येथील एका शेतकऱ्याच्या घरातून तर दिवसाढवळ्या तीन लाख ६९ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढलेले गुन्हे सामान्यांची झोप उडवणारे ठरत आहे. मागच्या चार दिवसांपूर्वी याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या व बाजारपेठचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दहिफळ गावातील नारायण रावसाहेब मते यांच्या घरात शिरकाव करत अज्ञात चोरट्यांनी एक लाख ३२ हजारांचा ऐवज लंपास केला होता.
याच दिवशी मध्यरात्री दहिफळ येथील गंगाराम बापूराव ढवळे यांच्या घरातही चोरट्यांनी हात साफ केला होता. ढवळे यांच्या घरातील तब्बल सव्वाचार लाख रुपयाचे सोन्याचे दागिने व ७५ हजार रुपयाची रोखड लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
एकाच दिवशी, एकाच गावात या जबरी चोऱ्या झाल्या होत्या. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात दिनांक ८ व ९ ऑगस्टला दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. असे असले तरी या प्रकारामुळे गावात चांगलेच घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
चौकट...
© मालक वावरात, चोर घरात...
दहिफळ येथील चोरीचे प्रकार ताजे असतानाच येरमाळा पोलीस ठाणे हद्दीतील बाभळगाव शिवारात आणखी एक चोरीचा प्रकार समोर आला आहे. येथील श्रीकांत बलभीम वाघमारे हे मस्सा मोहा रस्त्यावरील गट क्रमांक २१३ मध्ये वास्तव्य करतात. वाघमारे, त्यांचे वडील आपल्या शेतातील सोयाबीनला पाणी देत होते. कुटुंबातील इतर सदस्यही तेथेच इतर कामे करत होते. यामुळे घराला कुलूप लावून चावी बाथरूमच्या पत्र्याखाली ठेवली होती. काम आटपून घरी पोहचल्यावर त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे समोर आले. यामध्ये एक लाख ४५ हजाराचे सोन्याचे दागिने तर एक लाख ८४ हजाराची रोकड असा तीन लाख ६९ हजारांचा ऐवज लंपास झाला आहे.