भूम : गौरी-गणपतीच्या सणामुळे भूमची बाजारपेठ गजबजली असली, तरी जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने सण साजरे करताना खिशाला झळ बसत आहे.
मागील वर्षीपासून कोरोना महामारीमुळे विविध सण-उत्सव साजरे करताना अनेक बंधने आली. परंतु, गौरी-गणपती हा सर्वांत मोठा समजला जाणारा सण असल्याने नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी घराबाहेर पडल्याचे पाहावयास मिळाले. आशा परिस्थितीत खाद्यतेल, शेंगदाणे, रवा, तूप यासह इतर वस्तू तसेच गॅसचे देखील दर वाढल्याने सण साजरे करताना खिशाला मोठी झळ बसत आहे.
अलीकडच्या काळात गौरी-गणपतीसमोर नैवेद्य म्हणून ठेवल्या जाणाऱ्या बेसन लाडू, बुंदी लाडू, चकली, आदी फराळाचे प्रदार्थ रेडिमेड खरेदी करण्यावर नागरिकांचा भर दिसून येत आहे. तसेच रांगोळी, गौरीचे अलंकार, आरासाचे सामान, विविध प्रकारची फळे खरेदीसाठी देखील बाजारात गर्दी दिसून आली. लक्ष्मी आरासाचे साहित्य, सुवासिक अत्तर, फळे, हार, फुले, रेडिमेड फराळ, लक्ष्मी मुखवटे, कोथळे, विविध प्रकारच्या लायटिंग, आदींच्या दुकानात देखील रविवारी मोठी गर्दी होती.
चौकट
फुले, हारांच्याही किमती वाढल्या
यंदा पाऊस अधिक झाल्याने फुलांची आवक घटली आहे. सणासुदीच्या काळात फुले, गजरा, हार यांची मागणी वाढल्याने किमतीत देखील वाढ झाली आहे. त्यामुळे फुले, हार खरेदी करताना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.