आंबी : भूम तालुक्यातील आंबी शिवारातील पिकांवर सध्या किडीसह अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.
आंबी परिसरात सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. यात उडीद, मूग, सोयाबीन या पिकाचे क्षेत्र जास्त आहे. सद्य:स्थितीत पिकांची उगवण देखील चांगली असल्याने यातून चांगले उत्पन्न हाती पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. उडीद व मुगाला फुले लागत असून, पाऊसही चांगला पडत आल्यामुळे पिके समाधानकारक आहेत.
दरम्यान, या पिकांवर सध्या किडींसह अळीचा प्रदुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. यासाठी शेतकरी महागडी कीटकनाशके फवारणी करीत असून, यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे अळी व किडी घालवण्यासाठी कृषी विभागाकडून फवारणीसाठी औषधे मिळावीत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गावामध्ये काही शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने उडीद व सोयाबीन बियाणे देण्यात आलेली आहेत. कृषी सहायकाकडून फवारणीसाठी औषधे देण्यात येतील, असे सांगण्यात आल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
कोट..
यंदा चांगला पाऊस झाल्याने पेरणी क्षेत्र वाढले असून, सध्या पिकाची स्थितीही चांगली आहे; परंतु अळीच्या प्रादुर्भावामुळे चिंता वाढली आहे. एक एकर उडीद फवारणी करायची म्हटले तरी सातशे रुपयांचे कीटकनाशक लागते. माझी वीस एकर शेती आहे. एवढ्या क्षेत्रात फवारणी करणे परवडत नाही. यासाठी कृषी विभागाकडून मदत होणे गरजेचे आहे.
- आमोल गटकळ, शेतकरी.
आमच्याकडे सध्या तरी शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी कसलेही कीटकनाशक नाही. वरिष्ठ कार्यालयाकडे औषधाची मागणी केली आहे. ती मिळताच शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जातील.
- बी. जी. शिंदे, कृषी सहायक.