मार्च महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात बाधित रुग्ण आढळून येऊ शासनाने लॉकडाऊन जारी केले होते. कोरोना विरुध्दच्या लढ्यात आरोग्य विभागाला फ्रट लाईनवर येऊन सेवा देण्याचे काम करीत होता.
बाहेरील देशातून व राज्यातून येणाऱ्या व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी केली जात होती. पहिला रुग्ण २ एप्रिल आढल्यानंतर आरोग्य विभागाचा कस लागला होता. त्यानंतर दोन दिवसात नवीन दोन रुग्ण आढळून आले. डॉक्टर, स्टाफ नर्स यांनी तत्पर सेवा दिल्यानंतर रुग्ण उपचाराअंती बरे झाले. मे महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सची संख्या अपुरी पडत होती. त्यामुळे अत्यावश्यक असणाऱ्या साधन-सामुग्री उपलब्ध करण्यात आली. सध्या जिल्हात ७९ तर जिल्हा रुग्णालयात ५८ अशा १३७ व्हेंटिलेटर बसविण्यात आले आहेत. बायपॅप मशिन ९१,ईसीजी मशिन ६५ मशिनची भर पडली आहे. शिवाय, ऑक्सिजनचा साठा ठेवण्याकरिता ऑक्सिजन टँक कार्यान्वित करण्यात आला आहे.
आरटीपीसीआर लॅब
एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील संशयित व्यक्तींचे स्वॅब पुणे येथील प्रयोगशाळेत तपासण्यास पाठविण्यात येत होते. त्या ठिकाणाहून रिपोर्ट प्राप्त होण्यास विलंब होत असल्याने सोलापूर, लातूर, औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत स्वॅब पाठिवले जाऊ लागले. मात्र, रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जिल्ह्याच्या ठिकाणीच स्वॅब तपासणी व्हावी, अशी मागणी जिल्हावासियातून होत होती. लॅब तयार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत लोकसहभागातून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपकेंद्रात लॅब उभारण्यात आली.
मल्टी प्रा मॉनिटर्स
जळीत रुग्ण, अपघातातील रुग्ण, सर्पदंश, विषबाधा या अन्य क्रिटीकल रुग्णांच्या शरिरातील ऑक्सिजन, ब्लड प्रेशर, पल्स मोजण्याकरिता मल्टी प्रा मॉनिटर्स या उपकरण महत्वाचे असते. कोरोना काळात गंभीर रुग्ण वाढू लागल्याने जिल्ह्यातील १२५ व जिल्हा रुग्णालयात ८८ मल्टी प्रा मॉनिटर्स दाखल झाले आहेत. येत्या काळात क्रिटीकल रुग्णांच्या उपचारासाठी ही यंत्र उपयुक्त ठरणार आहेत.
डी डायमर कार्यान्वित
कोरोना बाधित रुग्णांना रक्तामध्ये गुठळ्या होण्याचा त्रास उद्भवण्याचे प्रमाण वाढत होते. रुग्णाच्या शरिरातील रक्तप्रवाह सुरळित आहे का याचे निदान करण्यासाठी डी डायमर चाचणी उपयुक्त ठरते. जिल्हा रुग्णालयात ही मशिन उपलब्ध नव्हती. त्यामुळे रुग्णांना खाजगी लॅबमधून तपासणी करुन घ्यावी लागत. प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन डी डायमर मशिन कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा रुग्णालया मंजूरी देण्यात आली. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला. रक्तसंबंधी आजाराच्या निदानासाठी ही मशिन रुग्णांच्या उपयोगात येणार आहे.