पारगाव : वाशी तालुक्यातील पिंपळगाव (क) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांना शाश्वत विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ ही योजना सुरू करण्यात आली. याचा शुभारंभ तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांच्या हस्ते करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शाश्वत विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी ही योजना अंमलात आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट ग्राहक मिळणार आहे. जे शेतकरी स्वतःहून पालेभाज्या, फळे, ग्राहकांना बांधावर विक्री करतात, त्यांच्यासाठी विक्री व्यवस्था उभारणीसाठी मदत केली जाणार आहे. याप्रसंगी कृषी साहाय्यक एम. एस. पवार, कृषी पर्यवेक्षक आर. एल. बनसोडे, मंडल कृषी अधिकारी आर. एन. शिंदे, कृषी पर्यवेक्षक बालाजी आटुळे, मोहन शिंगटे आदी शेतकरी उपस्थित होते.