उस्मानाबाद : सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी लासरा उच्चपातळी बंधाऱ्यातून रायगव्हाण प्रकल्पात अतिरिक्त पाणी सोडावे, अशी मागणी खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी मंगळवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
मंगळवारी खा. राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी जलसंपदा मंत्री पाटील यांची भेट घेऊन अतिरिक्त पाण्यासंदर्भात चर्चा केली. कळंब तालुक्यातील रायगव्हाण मध्यम प्रकल्प हा २००० मध्ये पूर्ण झाला आहे. मागील २० वर्षांत तो पाच वेळेस पूर्णत: भरला आहे. कमी पर्जन्यमानामुळे या प्रकल्पातून सिंचन व पाणी पुरवठा योजना मूळ नियोजनाव्दारे कार्यान्वित करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे मांजरा धरणाच्या खालील लासरा उच्च पातळी बंधाऱ्यातून अतिरिक्त ठरणारे ११.५३ दलघमी पाणी उपसाद्वारे लासरा-रांजणी-रायगव्हाण प्रकल्प अशा दहा किलोमीटर पाईपलाईनव्दारे रायगव्हाण मध्यम प्रकल्पामध्ये सोडण्यात यावे. या प्रकल्पात ७ दलघमी, तर उर्वरित ४.५३ दलघमी पाणी हे लासरा, रांजणी, रायगव्हाण, घारगाव, ताडगाव, जायफळ या क्षेत्रात येणारे गावतलाव, पाझर तलाव व इतर जलसंधारण प्रकल्पांमध्ये देता येईल, असे त्यांनी मंत्री पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे शाश्वत पाणीसाठा होऊन परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाचे फायदे होतील. सद्यस्थितीत शाश्वत प्रकल्पीय पाणीसाठा व प्रकल्पीय सिंचन होत नसल्यामुळे परिसरातील लोकांना, पशुधनाला पिण्याच्या पाण्यासाठी व सिंचनासाठी अडचण येत आहे. या परिसरात अनियमित पर्जन्यमान होत असल्यामुळे लासरा ते रायगव्हाण या उपसासिंचन योजनेचे सर्वेक्षण विचाराधीन असून, या सर्वेक्षणामध्ये या परिसरातील सिंचन प्रकल्पामध्ये पाणी वळविण्यासाठी संबंधित विभागास सूचना करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.