कळंब : संसाराच्या धावपळीतून, जबाबदारीच्या प्रापंचिक ओझ्यापासून बाहेर निघून आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातील प्रवास आनंददायी, प्रसन्न असावा ही निवृत्तीचे आयुष्य जगणाऱ्या प्रत्येकाची भावना असते. याला समजून घेऊन कळंब न. प. ने ज्येष्ठ नागरिकांचा परस्पर संवाद व्हावा, चर्चा व्हावी व त्यांना घडीभर का होईना वेगळ्या वातावरणात राहता यावे, यासाठी उतारवयाचा विरंगुळा या नावाने स्वतंत्र सभागृह उपलब्ध करून दिले आहे.
कळंब शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू बालोद्यानात ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ‘उतारवयातील विरंगुळा’ या कक्षाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. त्यांनीही या उपक्रमाचे कौतुक करून हा उपक्रम पथदर्शी उपक्रम व्हावा, अशी भावना व्यक्त केली. नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा व त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी यासाठी घेतलेल्या पुढाकाराचेही त्यांनी कौतुक केले. या विरंगुळा कक्षात मनोरंजन, वाचन यासाठी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. येथे आणखी सुविधा उपलब्ध करून त्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी नगर परिषदेने तालुका ज्येष्ठ नागरिक संघाकडे दिली आहे. विशेष म्हणजे हा कक्ष बालोद्यान परिसरात असल्यामुळे लहान मुलांना खेळण्या-बागडण्यासाठी घेऊन येणाऱ्या आजी-आजोबांना समवयस्क मंडळींबरोबर गप्पागोष्टी करता येणार आहेत.
सेवानिवृत्तीच्या आधी प्रत्येकाला त्यांच्या कामावरून ओळख मिळते. शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आदींना त्यांच्या पदासह ओळखले जाते. परंतु, सेवानिवृत्तीनंतर पेन्शनर एवढीच ओळख राहते. त्यामुळे सहसा सेवानिवृत्तीनंतर सगळे एकाच कट्ट्यावर गप्पा मारताना दिसतात. परंतु, कोणाच्यातरी दुकानासमोर, टपरीवर, पुलावर भेटू, असे दिले जाणारे ज्येष्ठ मंडळींचे निरोप आता विरंगुळा कक्षात भेटू, असे दिले जात आहेत. एकूणच राज्यात बहुदा पहिल्यांदाच पालिकेने ज्येष्ठांसाठी उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेमुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.
चौकट -
त्यांचे आशीर्वाद प्रेरणादायी
ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा कक्ष उपलब्ध करून देणे हे आमच्या सत्ताकाळातील खूप मोठे समाधान देणारे काम आहे. या माध्यमातून त्यांना काही वेळ त्यांच्या समवयस्क मंडळींसोबत घालवता येतील व सुखदुःखाच्या गोष्टी परस्पर वाटू शकतील. त्या मंडळींचे आशीर्वाद आमच्यासाठी कायम प्रेरणादायी ठरतील, असे नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांनी सांगितले.
चौकट -
प्राधान्यतत्त्वावर काम पूर्ण केले
प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी माझा सत्कार केला. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना मला विरंगुळा कक्षाची गरज जाणवली. त्यासाठी उद्यानातील जागा निश्चित करून युद्धपातळीवर तेथे सर्व सुविधायुक्त विरंगुळा कक्ष केवळ चार ते पाच दिवसांत तयार केला. या साडेचार वर्षांच्या काळात अनेक विकासकामे केली; पण हा उपक्रम आयुष्यभर समाधान देणारा ठरेल, असे उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी सांगितले.