धाराशिव/कळंब : बचत गटाच्या सदस्यांकडून उसने घेतलेले पैसे लाटण्याच्या उद्देशाने घरांमध्ये लिंबू-सुया टाकणाऱ्या व जादूटोण्याच्या साहाय्याने वंशाचा दिवा बुडवून टाकण्याची धमकी देणाऱ्या तांदूळवाडी येथील बंटी-बबलीवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री कळंब पोलिसांनी महिला सदस्याच्या तक्रारीवरून महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंध अधिनियमाच्या आधारे गुन्ह्याची नोंद केली आहे.
कळंब तालुक्यातील तांदूळवाडी येथे काही महिन्यांपूर्वी गावातील महिलांनी एकत्र येत कुलस्वामिनी बचत गटाची स्थापना केली होती. या बचत गटाला एका बँकेकडून ४ लाख ९५ हजार रुपयांचे कर्जही नुकतेच मिळाले होते. या कर्जाची रक्कम गटाच्या सदस्यांमध्ये विभागून देण्यात आली होती. दरम्यान, या गटाची सचिव म्हणून काम करणारी सविता डिकले व तिचा पती सचिन डिकले यांनी आपणास पैशांचे काम असल्याने काही दिवसांसाठी उसने पैसे देण्याची मागणी सदस्यांकडे केली. त्यांनी अनेक सदस्यांकडून ३ लाख ९० हजार रुपये जमा केले. दरम्यान, हे पैसे परत मिळत नसल्याने महिला सदस्यांनी सविता डिकले यांच्याकडे मागणी सुरू केली होती. मात्र, तगादा वाढल्यानंतर सविता व सचिन डिकले या दाम्पत्याने जादूटोण्याची क्लुप्ती लढवून पैसे मागणाऱ्या महिलांना धमकावणे सुरू केले. ते खरे वाटावे, यासाठी संबंधित महिलांच्या घरी लिंबू-सुया, हळदी-कुंकू, बुक्का, राख टाकण्यात आली. यामुळे महिला सदस्यांसह त्यांचे कुटुंबीयही घाबरून गेले होते. मात्र, त्यांनीच धीर एकवटून आठवडाभरापूर्वी कळंब पोलिसांकडे लेखी तक्रार दिली. ग्रामपंचायतीनेही पोलिसांना काही पुरावे दिल्यानंतर अखेर कळंब पोलिसांनी सोमवारी रात्री या ठकसेन दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे.
नव्या वर्षातील पहिला गुन्हाजादूटोण्याचे प्रकार ग्रामीण भागात नागरिकांना भीती घालण्यासाठी सर्रास चालतात. मात्र, अशी प्रकरणे सहसा पोलिसांपर्यंत पोहोचत नाहीत. मात्र, तांदूळवाडीतील महिलांनी धाडस केल्याने या प्रकरणात जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार या वर्षातील पहिलाच गुन्हा नोंद झाला आहे.
वंशाचा दिवा बुडवून टाकेनआरोपी सविता डिकले ही पैसे मागण्यास गेल्यावर महिलांना माझ्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगायची. मला भानामती येते, तुमच्या वंशाचा दिवा बुडवून टाकेन, तलवारीने कापून टाकेन, अशा धमक्या द्यायची, अशी तक्रार महिलांनी पोलिसांकडे केली आहे.