कळंब (उस्मानाबाद ) : शेतकरी कुंटूबातील महिलांचाहीशेती करण्यात सहभाग असतो.यामुळे अशा कुंटुबाचे जीवनमान उंचावण्यासाठी या महिलांना तंत्रशुद्ध शेतीचे व शेतीपुरक उद्योगाचे धडे देण्याची गरज आहे. हाच धागा पकडून कळंब येथील पर्याय संस्थेने तालुक्यातील तीन गावांतील ६४ महिलांना तंत्रशुद्ध शेतीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.
हसेगाव (के) ता. कळंब येथील पर्याय सामाजिक संस्था गत अनेक वर्षापर्यंत कळंब तालुक्यातील विविध गावात रचनात्मक कार्य करत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी, यासाठी विविध उपक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जात आहेत. महिलांचे संघटन करून, बचतगटांच्या माध्यमातून त्यांच्या अर्थकारणाला बळ दिले जात आहे.एकल महिलांचे संघटन करून त्यांना आत्मनिर्भर केले जात आहे. विविध लघु, गृह व शेतीपूरक उद्योग करण्याची प्रेरणा देवून महिलांना स्वयंसिद्धा म्हणून पुढे आणले जात आहे. ‘पर्याय’चे प्रमुख विश्वनाथ तोडकर यांच्या प्रयत्नांतून या कार्यासोबतच पर्यायने विविध उद्योगांच्या व स्वयंसेवी संस्थांच्या सहयोगातून जलसंधारण व जलजागृतीचे काम केले आहे.
यातून अनेक नदी, नाल्यांनी मोकळा श्वास तर घेतला आहेच, शिवाय कोट्यावधी लिटर पाणी साठवले गेले आहे. पन्नासपेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या झालेल्या कुंटुबाना हक्काचे घरकूल दिले आहे. विधायक व रचनात्मक कार्यात सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या पर्याय संस्थेने आता सुमंत मुळगावकर डेव्हलपमेंट फाऊंडेशन यांच्या सहयोगातून शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढीसाठी महिला शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध शेतीची दिशा देण्याचा संकल्प केला आहे. अनेक कुटुंबातील शेतीमध्ये पुरूषांइतकेच महिलांचेही योगदान असते. यामुळेच प्रशिक्षण कार्यक्रमात महिला हा घटक समोर ठेवून नियोजन करण्यात आले आहे.
यानुसार मंगळवारी कळंब पंचायत समितीच्या सभागृहात एक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पर्यायचे प्रमूख विश्वनाथ तोडकर, गट विकास अधिकारी राजगुरू, तालुका कृषी अधिकारी अशोक संसारे, विलास गोडगे, अशोक तोडकर, सुनिल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी बालाजी शेंडगे, सुनंदा खराटे,विकास कुदळे, असीफ मुलानी, दत्तात्रय ताटे, आश्रूबा गायकवाड, जयश्री शेनमारे, सुनीता मते, हनुमंत धोंगडे, नरसिंग मते यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आश्रूबा गायकवाड यांनी केले.