तुळजापूर : सहा महिन्यांपासून श्री तुळजाभवानी मंदिर बंद असल्याने मंदिरावर अवलंबून असलेल्या कुटूंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे राज्य शासनाने मंदिर उघडण्याची परवानगी द्यावी. सरकारने परवानगी दिली नाही, तर आपण शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेऊ. तसेच वेळ पडल्यास उच्च न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा आ. राणाजगजित सिंह पाटील यांनी गुरूवारी दिला.
आ. पाटील यांनी श्री तुळजाभवानी मंदिर व राज्यातील इतर मंदिर उघडण्याच्या अनुषंगाने गुरूवारी पत्रकार परिषद घेतली. मागील महिन्यात धार्मिक स्थळे सुरू करण्यासंदर्भात संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी राज्य सरकारने आठ- दहा दिवसात निर्णय घेऊ, असे जाहीर केले होते. यानंतर बुधवारी रेस्टॉरंट, बार, परमिट रूम, रेल्वे सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र मंदिराबाबत निर्णय घेतला नाही. तुळजापूर शहर हे फक्त तुळजाभवानी मंदिरावर अवलंबून आहे. या मंदिरामुळे हजारो लोकांना रोजगार मिळतो. तसेच पुजारी, व्यापारी यांचेही अर्थकारण याच मंदिरावर चालते. त्यामुळे हे मंदिर लवकरात लवकर उघडावे, यासाठी आपण पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी नगरसेवक विनोद गंगणे, नगरसेवक बापूसाहेब कणे, नागेश नाईक, बाळासाहेब शामराज, शिवाजीराव बोदले, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ शिंदे, नारायण ननवरे आदी उपस्थित होते.