तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : ग्रामपंचायत निवडणूक म्हटले की हेवेदावे, वाद-प्रतिवाद हे आलेच. पण या निवडणुका आता इतक्या टोकाला गेल्या की थेट एका महिला उमेदवाराच्या मुलास धमकावण्यासोबतच खासदार व जिल्हाधिकाऱ्यांनाही बघून घेण्याची धमकी मसला खुर्दमध्ये दिली गेली. अज्ञाताने उमेदवाराच्या घरावर चिठ्ठी डकवून हा प्रकार घडवून आणला.
तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील प्रभाग क्रमांक ४ मधील महिला उमेदवार कांताबाई अण्णाराव साळवे यांच्या घराच्या शटरला अज्ञात व्यक्तीने धमकीची चिठ्ठी डकवल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे. या ग्रामपंचायतीत ११ सदस्य व १ सरपंचपदाची जागा आहे. सरपंचपदासाठी रामेश्वर शंभुदेव वैद्य यांच्यासह ७ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. आता ४ जागांसाठी ७ जण निवडणूक रिंगणात आहेत. यातील प्रभाग ४ मधून कांताबाई अण्णाराव साळवे या निवडणूक रिंगणात आहेत. प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना शुक्रवारच्या पहाटे अज्ञाताने त्यांच्या घराच्या शटरला धमकीची चिठ्ठी डकवल्याचे सकाळी निदर्शनास आले. यामध्ये उमेदवाराच्या मुलासह खासदार व जिल्हाधिकारी यांनाही धमकावण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकाराची माहिती कळताच तामलवाडी ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन पंडित व पोलीस नाईक काझी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. पोलीस ठाण्यात याविषयी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
काय आहे त्या चिठ्ठीत?''ज्ञानेश्वर साळवे मदत कर. मतदानातून माघार घे. शेवट पाठिंबा दे. नाहीतर गावात रहायचं अवघड होईल. तुझा खासदार ओम बाळ, तुझा कलेक्टर व तुला बघून घेऊ. वेळ आली तर संपवून टाकू. तुझ्या आईला मतदान कोण करतंय ते आम्ही बघतावच. खासदार व कलेक्टरला पण आण. त्यांना पण परिणाम भोगावे लागतील. तुला व तुझ्या आईला मतदान करतील त्याला संपवून शेवट करू.''