उमरगा (जि. उस्मानाबाद) : शेतीच्या उत्पन्नावरून झालेल्या वादातून वडील झोपलेले असताना त्यांचा खून करणाऱ्या मुलाला शुक्रवारी उमरगा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
मुरुम येथील मलकाप्पा ढाले यांची मुरुम शिवारात दोन एकर शेती आहे. ही शेती ते भाडेपट्ट्याने इतरांना कसायला देत असत. २ एप्रिल २०१७ रोजी त्यांचा मुलगा धनराज ढाले शेतजमिनीच्या भाड्याचे पैसे वडील मलकाप्पा यांच्याकडे मागत होता. यावरून त्या दोघांत वादही झाला. या वादातूनच मुलाने आधी वडिलांना मारहाणही केली. मद्यपान करून पैसे नाही दिल्यास जाळून मारण्याची धमकी त्याने यावेळी दिली होती. दरम्यान, २ एप्रिल रोजी आरोपी धनराजची आई शांताबाई या शेजारी झोपण्यासाठी गेल्या होत्या, तर मलकाप्पा हे नेहमीप्रमाणे घरासमोरील लायक मुल्ला यांच्या कडब्याच्या गंजीशेजारी पलंगावर झोपी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी धनराजने वडील झोपेत असताना त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले व तेथून पळ काढला. या घटनेत मलकाप्पा यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी शांताबाई ढाले यांच्या फिर्यादीवरून मुरूम पोलिसांनी आरोपी धनराज ढालेविरुद्ध गुन्हा नोंद केला. तत्कालीन पोलीस निरीक्षक आर. ए. मोमीन यांनी उपनिरीक्षक बी. बी. गोबाडे यांच्यासह तपास करून दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयात चाललेल्या या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. यात डॉ. सत्यजित डुकरे, मयताची पत्नी शांताबाई ढाले, मलंग मासूलदार, सिराज फनेपुरे, प्रवीण गायकवाड व जिंदावली सन्नाटे यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. तसेच उपनिरीक्षक ए. पी. खोडेवार व सहायक उपनिरीक्षक बी. एम. भूमकर यांनी पैरवी केली. समोर आलेले साक्षी-पुरावे व सहायक शासकीय अभियोक्ता संदीप देशपांडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्या. एस. बी. साळुंखे यांनी आरोपी धनराज ढाले यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.