पाथरुड : खरिपाचा हंगाम अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी खरीपपूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे; परंतु कोरोनाचे संकट याहीवर्षी कायम असल्याने जनावरांचाही बाजार बंद असून, प्रामुख्याने शेतीसाठी लागणारी बैलजोडी खरेदी कुठून करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर कायम आहे.
कोरोनाची दुसरी लाट शहरासह ग्रामीण भागातदेखील वेगाने पसरत आहे. घराघरात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून, यात अनेकांचे मृत्यूही होत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे छोटे-मोठे आठवडी बाजार तसेच जनावरांचे बाजारदेखील बंद आहेत. पावसाळा तोंडावर आला, की शेतकऱ्यांना मशागतीसाठी बैलांची गरज असते; परंतु सध्या पशुधनाचे बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना पशुधन विकणे व घेणे अवघड झाले आहे. ट्रॅक्टरच्या साह्याने शेतातील सर्व कामे होत असली तरी सर्वसामान्य शेतकऱ्यांना ते परवडणारे नाही. सध्या खरीप हंगाम पंधरा दिवसात सुरू होत आहे; मात्र कोरोनाने मागील दीड वर्षांपासून परिसरातील वालवडसह शेजारील तालुका बाजारपेठ असलेल्या जामखेड येथील जनावरांचा बाजार बंद आहे. त्यातच बैलांची संख्याही कमी असल्याने शेतकऱ्यांना गावोगावी फिरुनच बैलांचा शोध घ्यावा लागत आहे. बाजार बंद असल्याने व्यापाऱ्यांकडूनही बैलांच्या किमती अव्वाच्या सव्वा सांगितल्या जात आहेत. त्यामुळे बैलजोडी घेताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.
ट्रॅक्टरचा वापरही आवाक्याबाहेर
दरवर्षी रबीची पेरणी उरकल्यानंतर, तसेच ऊस वाहतूक बंद झाल्यानंतर अनेक शेतकरी आपली बैलजोडी विकतात व पुढील हंगामासाठी बैलांची गरज असल्याने पुन्हा मे महिन्यात खरेदी करतात; मात्र गेल्या दीड वर्षांपासून बैलांचे बाजार बंद असल्याने अगोदर चाळीस ते पन्नास हजार रुपयांना विकलेली बैलजोडी आता दुप्पट किमतीतही मिळणे कठीण झाले आहे. यामुळे नवीन बैलजोडी घेताना सर्वसामान्य शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. ट्रॅक्टरच्या साह्याने एक एकर मोगडणी करायचे म्हटले तर हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरची महागडी मशागत शेतीस परवडणारी नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांना बैलजोडी घेण्यासाठी गावोगावी व्यापाऱ्यांकडे जावे लागत आहे.
मनपसंत बैलजोडी मिळणे अवघड
बाजारात शेकडो बैलजोड्या पहायला मिळतात. त्यामुळे शेतकरी मनपसंत बैलजोडी निवडतात. विशेषत: खरीप हंगामाच्या तोंडावर बाजारात बैल खरेदी-विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड उडते; परंतु सध्या कोरोनाने बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना गावोगावी जाऊन विचारणा करावी लागत आहे. शिवाय, शेतकरी अथवा व्यापाऱ्यांकडे उपलब्ध असेल ती बैलजोडी अव्वाच्या सव्वा भाव देऊन खरेदी करावी लागत आहे.