लोहारा : तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील एका युवकाने मंगळवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी मंगळवारी रात्री दोन महिलांसह नऊ जणांविरूध्द लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील शाम राजेंद्र जाधव (वय २३) हा युवक मागील दोन वर्षापासून तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. मात्र, तुळजापूर येथीलच रमाबाई पंडागळे, मिनाक्षीबाई भोजने, मंदिरातील सुरक्षारक्षक पारधे, विनायक काळे, मल्लिकार्जुन भोजने, रणजित भोजने, गुरुनाथ काळे, रमाबाई पंडागळे यांचा भाऊ व चौधरी यांचे पती हे नऊ जण संगनमत करुन शाम जाधव याला ‘आम्हाला तीन लाख रुपये दे, नाही तर तुझ्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करु’ असे म्हणून त्रास देत होते.
तसेच शामला मारहाण करण्यात आली होती़ होणारा त्रास आणि आपली बदनामी होईल या भितीपोटी त्याने मंगळवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद मयताची आई राजश्री राजेंद्र जाधव यांनी मंगळवारी रात्री उशिरा लोहारा पोलीस ठाण्यात दिली़ जयश्री जाधव यांच्या फिर्यादीवरून वरील नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस उपनिरीक्षक गंगाधर दराडे हे करीत आहेत.