उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा चैत्री पौर्णिमा उत्सव ऐन मतदानादिवशीच आला आहे़ त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची चिंता वाढली असून, आधी देवीदर्शन की मतदान? हा संभ्रम दूर अंतरावरील भाविकांत निर्माण झाला आहे़
तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीचा चैैत्री पौर्णिमा उत्सव १७ व १८ एप्रिल रोजी होऊ घातला आहे़ यानिमित्त तुळजापुरात मोठी यात्रा भरते़ यासाठी संबंध महाराष्ट्रातून तसेच आंध्र, तेलंगणा, कर्नाटक व शेजारील अन्य राज्यातूनही भाविकांची लाखोंच्या संख्येने उपस्थिती असते़ दरम्यान, ही यात्रा दुसऱ्या टप्प्यातील ऐन मतदानादिवशीच आहे़ १८ एप्रिलला या टप्प्यातील मतदान होणार आहे़ यात महाराष्ट्रातील उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, सोलापूर मतदारसंघांचा समावेश आहे.
यातील दूर अंतरावरील मतदारसंघात राहणाऱ्या तुळजाभवानी देवीच्या भाविकांची कोंडी झाली आहे़ मतदानाचे कर्तव्य बजावायचे की देवीदर्शन? यावरुन ते संभ्रमात आहेत़ नेहमी समारोपाच्या उत्सवाची वारी करणाऱ्या भाविकांना आता पहिल्या दिवशी म्हणजेच १७ एप्रिल रोजी यात्रा करुन १८ एप्रिलला मतदानासाठी आपापल्या भागात उपस्थित राहता येऊ शकते़ तरीही दुसऱ्या टप्प्यातील मतदानावर काहिअंशी परिणाम होण्याची शक्यता आहेच़