उस्मानाबाद : ‘उधर से पानी का लोंढा आया, और सबीच बह के गया... कुछ भी नही बचा... देखो तुमीच, तुम्ही माई-बाप है अब... कुछ मदद दिला देव...’ ही कळवळीची भावना आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची... तोडक्या-मोडक्या हिंदीतच सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांपुढे आपल्या भावना अन् अडचणी मांडत मदतीसाठी साकडे घातले.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा, उमरगा या भागात सर्वाधिक नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सोमवारी केंद्रीय पथकातील उपसचिव यशपाल व अभियंता असलेले तुषार व्यास सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल झाले. पाहणीची सुरुवात त्यांनी उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथून केली.
या ठिकाणी पूरसदृश स्थितीने शेतीची झालेली अवस्था त्यांनी पाहिली. खरडून गेलेल्या जमिनी, गाळाने बुजलेल्या विहिरी, उखडून गेलेली पाइपलाइन, शेतात साचलेली वाळू, दगड-गोटे या बाबी त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. यानंतर त्यांनी पाटोदा येथेही पाहणी केली.
पथक केशेगाव येथील रखमाजी डोलारे यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी करीत होते. अतिवृष्टीने नुकसान झाल्याने ऊस कारखान्याला गेला नव्हता. त्यामुळे त्यास तुरा फुटला. व्यास यांना त्याबद्दल कुतूहल वाटले. त्यांनी ‘इस गन्ने पे ये दुसरा क्या लगा है’, असे विचारले. त्यावर ऊस परिपक्व झाल्यावर तुरा फुटतो. ताे उसाचाच भाग असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
जालना, औरंगाबाद जिल्ह्यातही पाहणीजालना : केंद्रीय पथकाने सोमवारी जिल्ह्यातील पाच ते सात गावांना भेट दिली. औरंगाबादहून प्रथम या पथकाने बदनापूर तालुक्यातील वाकुळणी, रोषणगाव, हिरवा या गावांना भेटी दिल्या, तसेच जालना तालुक्यातील नंदापूर आणि जालना कृषी उत्पन्न बाजार समितीला या पथकाने भेट दिली. दरम्यान, या पथकाने औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण आणि गंगापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्याही भेटी घेतल्या. पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यापूर्वीही पाहणी केली होती, तीच मदत आणखी मिळाली नाही, आता तुम्ही कधी अहवाल देणार आणि कधी नुकसानभरपाई मिळणार, असे प्रश्न पथकाला करण्यात आले, परंतु यावर पथकातील अधिकाऱ्यांनी कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही.