लाॅकडाऊनमुळे एसटी महामंडळाच्या बसेसची चाके थांबली होती. मागील तीन महिन्यांपासून बसेस धावू लागल्या आहेत. मात्र, कोरोनाच्या धास्तीने प्रवासी बसकडे पाठ फिरवित होते. सध्या कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे प्रवासी खबरदारी घेत बसने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे एसटीच्या बसफेऱ्याही वाढविल्या आहेत. त्यातून एसटीला चांगले उत्पन्नही मिळत आहे. बसस्थानकाच्या इमारतीची स्वच्छताही वेळेवर केली जात आहे. मात्र, परिसरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. अशा रस्त्यावरुनच बसेसची नेहमी वर्दळ असते. परिणामी, बसस्थानकात धुळीचे लोट पसरत असतात. यामुळे प्रवाशांचे कपडे, बॅग धुळीने माखून जात आहेत. शिवाय, डोळ्यांचा त्रासही होत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. बसच्या खिडकी उघडताच बसमध्ये धुळीचे लोट येत असल्याने बसमधील आसनावर धुळीचे थर साचत आहेत. धुळीमुळे इमारतीच्या साफसफाईसाठी ४ मजूरही महामंडळाने नेमले आहेत.
दरम्यान, अनलाॅकनंतर एसटी बसला प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. त्यामुळे उस्मानाबाद आगारातून ३०० च्या जवळपास बसेस नियमित धावत आहेत. १२ हजारांच्या जवळपास प्रवासी प्रवास करीत असून, यातून आगारास दिवसाकाठी ८ लाखांचे उत्पन्न मिळत आहे.
पॉईंटर
येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी सुलभ शाैचालये बांधण्यात आले आहे.
या शाैचालयाची नियमित साफसफाई होत नसल्याने दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे आराेग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात.
बसस्थानक इमारतीची मात्र, नियमित साफसफाई केली जात आहे. ४ मजूर दररोज बसस्थानक परिसर स्वच्छ करण्यासाठी नेमण्यात आले आहेत.
बसस्थानकात वाहनांची गर्दी होऊ नये, यासाठी वाहन पार्किंगची स्वतंत्र सोय केली आहे.
माेकाट श्वानांचा प्रवाशांना नाहक त्रास
बसस्थानकात वराह तसेच श्वानांचा मुक्त संचार असतो. त्यामुळे बसचालकांना बस चालविताना कसरत करावी लागते.
मद्यपीही बसस्थानक परिसरात लोळताना आढळून येतात. श्वानांचा इमारतीत वावर असल्याने प्रवाशांना पिशव्यांचा सांभाळ करावा लागतो.
नवीन इमारतीला मंजुरी मिळालेली आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर बांधकाम सुरू होईल, त्यानंतर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी ४ मजूर साफसफाईसाठी नेमले आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी मास्क अनिवार्य केले आहे.
पी. एम. पाटील, आगारप्रमुख
बसस्थानकात प्रवाशांना पिण्याचे पाणी असावे लागते. मात्र, अनेकवेळा पाणीच नसते. त्यामुळे प्रवाशांना हाॅटेलमध्ये जाऊन पाण्याची बाटली घ्यावी लागते. मोकाट कुत्र्यांचा नेहमी वावर असतो. त्यामुळे लहान मुले व हातातील पिशवी सांभाळत बसावे लागते.
विलास मते, प्रवासी
कोरोनाच्या धास्तीने मास्क वापरण्यावर भर दिला आहे. बसमध्ये बसतानाही काळजी घेतली जाते. मात्र, बसच्या फेरीनंतर निर्जंतुकीकरण होत नाही. तसेच, धुळीमुळे बसमधील आसनेही माखलेली असतात. महामंडळाने बसेसचे निर्जंतुकीरण तसेच बसची साफसफाई करावी.
रेश्मा लांडगे, महिला प्रवासी