मुरूम- शहरात मागील वर्षभरापासून कृषी मंडळ अधिकाऱ्याचे कार्यालयच नसल्याने मंडळांतर्गत येणाऱ्या ३९ गावांचा कृषी विभागाचा कारभार मंडळ कृषी अधिकारी हे उमरग्यातूनच पाहत आहेत. त्यामुळे मुरूम कृषी मंडळ आता नावालाच उरले असून, १२ कृषी सहायकच सध्या मंडळाचे काम पाहत आहेत.
मुरूम मंडळांतर्गत ३५ हजार ५०० हेक्टर एकूण क्षेत्र असून, यापैकी ३४ हजार ६८८ हेक्टरवर खरिपाची पेरणी होण्याची शक्यता आहे. शहर परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी सुरू केली आहे. ऐन पेरणीच्या काळात मंडळ कृषी अधिकारीच गायब असल्याने पेरणीसंदर्भात केवळ कृषी सहायकच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असल्याचे दिसून येत आहे. मुरूम कृषी मंडळांतर्गत ३९ गावांचा समावेश आहे. मात्र, मुरूमला मंडळ कृषी अधिकारी यांचे कार्यालयच अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांना उमरगा येथे कृषीच्या कामासंदर्भात हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे मुरूम कृषी मंडळ केवळ नावालाच आहे का, असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे. मेच्या शेवटच्या आठवड्यात आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाच्या ओलीवर परिसरातील शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी सुरू आहे, तर दुसरीकडे जोपर्यंत १०० मिलीमीटर पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी करू नये, असे कृषी विभागाकडून सांगितले जात असले तरी शेतकरी मात्र आहे त्या ओलीवरच पेरणी करत आहे. पेरणीच्या काळात व पेरणीपूर्वी गावागावात जाऊन शेतकऱ्यांचे कृषी विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांनी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणे व विविध कृषी योजनांची माहिती देणे आवश्यक आहे. असे असताना केवळ कृषी सहायकाच्या खांद्यावर मंडळ अधिकारी बंदूक ठेवून कारभार चालवत असल्याचे दिसून येत आहे.
चाैकट...
मुरूम शहरातील लोकसंख्या २५ हजारांच्या जवळपास आहे. शहरात नगर परिषद, बँका, पोलीस स्टेशन, बाजार समिती, ग्रामीण रुग्णालय, पशुधन रुग्णालय, महावितरण, तलाठी कार्यालय आहेत. मात्र, मंडळ कृषी कार्यालय शहरात नसल्याने शेतकऱ्यांना कृषीसंदर्भातील कामांसाठी उमरगा येथे हेलपाटे मारावे लागत आहेत. शहरातील वीज उपकेंद्राजवळ असलेल्या पाटबंधारे विभागाच्या इमारतीत पूर्वी मंडळ कृषी अधिकारी कार्यालय होते. मात्र, ही इमारत धोकादायक असल्याचे कारण पुढे करीत मंडळ कृषी अधिकारी आपला कारभार उमरगा येथील तालुका कृषी कार्यालयातूनच मागील वर्षभरापासून हाकत आहेत. त्यामुळे मुरूम कृषी मंडळ केवळ नावालाच आहे का, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
यासंदर्भात उमरगा येथील तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव म्हणाले, मुरूम मंडळाचे कृषी अधिकारी लग्नानिमित्त रजेवर आहेत. त्यामुळे फोन उचलत नसतील शेतकऱ्यांना पेरणीसंंदर्भात व कृषी योजनांसंदर्भातील माहिती कृषी सहायक गावागावात देत आहेत. शेतकऱ्यांना काही अडचण असल्यास संबंधित गावाच्या कृषी सहायकाशी संपर्क करावा. मंडळ कृषी अधिकारी यांच्या बाबतीत तक्रार असल्यास आमच्याकडे शेतकऱ्यांनी लेखी तक्रार करावी. तक्रारीत तथ्य असेल तर निश्चितपणे कारवाई केली जाईल.