उस्मानाबाद : मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढत आहे. यंदाही सुमारे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होईल असे, गृहीत धरून कृषी विभागाने बियाणांची मागणी केली होती. त्यानुसार जिल्ह्यासाठी सुमारे १८ हजार क्विंटल महाबीज सोयाबीन बियाणे मंजूर झाले होते. यापैकी आजवर उपलब्ध झालेले साडेबारा हजार क्विंटल बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे. परिणामी, सध्या बाजरपेठेत हे बियाणे मिळणे कठीण झाले आहे.
नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या सोयाबीन पिकाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळेच मागील एक वर्षापासून सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. मागील वर्षी सुमारे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीन पिकाखाली आले होते. सोयाबीनला मिळालेल्या चांगल्या दरामुळे यंदा शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकाकडे कल अधिक वाढला आहे. त्यानुसार कृषी विभागाने बियाणांचे नियोजन करू मागणी नोंदविली होती. असे असतानाच गत वर्षीच्या तुलनेत सोयाबीन बियाणे उत्पादक खाजगी कंपन्यांनी दरामध्ये मोठी वाढ केली आहे. मात्र, महबीजचे दर जवळपास कायम ठेवले आहेत. त्यामुळे खाजगी कंपन्या आणि महाबीजच्या दरात ८०० ते १,००० रुपयांची तफावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा महाबीज सोयाबीन बियाणाकडे कल वाढला आहे. आजवर महाबीजकडून जिल्ह्याला १८ हजार क्विंटलपैकी १२ हजार ५०० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. हे बियाणे अवघ्या काही दिवसांतच शेतकऱ्यांनी खरेदी केले. त्यामुळे सध्या बाजारपेठेत या बियाणाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना खाजगी कंपन्यांचे तुलनेने महागडे बियाणे खरेदी करावे लागत आहे.
चौकट...
६,५०० क्विंटल बियाणाची प्रतीक्षा...
महाबीजकडे सुमारे १८ हजार क्विंटल बियांची मागणी केली होती. आजवर यापैकी साडेबारा हजार क्विंटल बियाणे दाखल झाले आहे. आणखी साडेसहा हजार क्विंटल बियाणे येणे बाकी आहे. हे बियाणे येणार कधी? असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत.
म्हणे, अडीच लाख क्विंटल घरगुती बियाणे...
यंदा वेळेवर आणि मुबलक पाऊस पडेल, असे भाकीत हवामान खात्याने केले आहे. त्यामुळे शेतकरी खरीप पेरणीसाठी लागणारे बियाणे, खताची जमवाजमव करू लागले आहेत. मात्र, बियाणांच्या काही वाणाचा सध्या तुटवडा आहे. असे असे तरी अनेक शेतकरी घरगुती बियाणे पेरणार आहेत, असे ‘कृषी’कडून सांगण्यात आले. असे सुमारे अडीच लाख क्विंटल बियाणे शेतकऱ्यांकडे असल्याचा दावाही अधिकारी करीत आहेत.
तर उडीद, मूग वाढेल!
जून महिना उजाडताच जिल्ह्याच्या काही भागांत चांगला पाऊस झाला आहे. काहींनी चाड्यावर मूठ धरली आहे. मात्र, अद्याप सर्वदूर पाऊस झालेला नाही. हा पाऊस वेळेवर पडल्यास उडीद, मूग या पिकांचा पेराही वाढू शकतो.