Maharashtra Assembly Election 2024 : धाराशिव : महाविकास आघाडीत अखेरपर्यंत मार्ग न निघालेल्या जागांमध्ये परंडा मतदारसंघाचा समावेश आहे. शिवाय, तो आरोग्य मंत्र्यांचा मतदारसंघ म्हणूनही राज्यभर चर्चेत आहेच. मंत्री तानाजी सावंत यांना येथील मैदानात यावेळी उद्धवसेना व शरद पवार गटाच्या पैलवानांना सामोरे जावे लागणार आहे.
परंड्यातून मंत्री तानाजी सावंत पुन्हा मैदानात आहेत. माजी आ. राहुल मोटेंना शरद पवार गटाने, तर रणजित पाटील यांना उद्धवसेनेने उमेदवारी दिली आहे. आघाडीतून यावेळी येथे दोन उमेदवार झाले आहेत. असे असले तरी सेनेच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा आघाडीलाच होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. तर दुसरीकडे आघाडीच्या मतांचे विभाजन होऊन महायुतीला फायदा होण्याची शक्यता चर्चिली जात आहे. जरांगे पाटील यांनी उमेदवार दिल्यास वेगळेच चित्र येथे दिसू शकते.
मराठा उमेदवारावर सर्वांचेच आहे लक्ष... मराठा आरक्षण आंदोलनाला परंडा मतदारसंघातून मोठे समर्थन मिळाले होते. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार दिल्यास काही अनपेक्षित निकालही येथून येऊ शकतात. उद्धवसेनेचे रणजीत पाटील यांच्याविषयीच्या सहानुभूतीमुळे बरीच मते त्यांच्याकडे वळू शकतात. यामुळे मतविभाजन येथे कळीचा मुद्दा आहे.
लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय?मागच्या लोकसभा निवडणुकीत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या परंडा विधानसभा मतदारसंघातून उद्धवसेनेचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांना ८१ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. तेव्हाचे मुद्दे आता पूर्णत: राहिले नसले तरी ती वावटळ अजूनही पूर्णपणे शमलेली नाही. लोकसभेला सोयाबीन दराचा मुद्दा मतदारांनी उचलून धरला होता. आताही तो आहेच. त्यातून महायुती कसा मार्ग काढते? यावर बरेच काही अवलंबून आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्देआरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मतदारसंघात आणलेला निधी तसेच कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेच्या पाण्याचा मुद्दा महायुतीकडून आहे.प्रतिस्पर्ध्यांनी सोयाबीनचा घसरलेला दर, भ्रष्टाचार, परजिल्ह्यातील उमेदवार या मुद्यांसोबतच त्यांच्या काळातील सिंचन सुविधांच्या मुद्द्यांवर भर दिला आहे.